लेझीमच्या मर्दानी खेळाबरोबर सादर केलेल्या विविध चित्तथरारक कसरती, डॉल्बीच्या तालावर तरुणाईचा जल्लोष, नयनरम्य देखावे, गुलालाची मुक्त उधळण, डौलाने फडकणारे भगवे ध्वज, सोबत जय भवानी-जय शिवाजी, हर हर महादेवच्या स्फूर्तिदायी घोषणा अशा उत्साही वातावरणात निघालेल्या भव्य मिरवणुकीने सोलापुरात गुरुवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. या मिरवणुकीत हजारोंचा जमाव सहभागी झाला होता.
शहरात यंदा शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिळून २५० सार्वजनिक मंडळांनी शिवरायांच्या प्रतिमा व मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. गेले तीन-चार दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा शिंदे चौकातील डाळिंबी आड मैदानावर शिवजयंती मध्यवर्ती उत्सव महामंडळाच्या वतीने कुस्ती, कबड्डी स्पर्धासह विविध उपक्रम राबविण्यात आले होते. सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख व महापौर प्रा. सुशीला आबुटे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. शिवजयंतीदिनी कोल्हापूरच्या करवीर संस्थानचे युवराज मालोजीराजे यांच्या हस्ते या मध्यवर्ती महामंडळाच्या शिवरायांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आल्यानंतर भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बी सिस्टिम्सच्या वापरावर बंदी घातण्यात आली असली तरी काही बडय़ा मंडळांनी शिवजयंती मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करीत तरुणाईला थिरकायला लावले. परंतु त्याचवेळी काही मंडळांनी डॉल्बीच्या जमान्यातही लेझीम, झांज व अन्य खेळ सादर करीत तरुणाईला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्रसिध्द हलग्यांचे पथक, संगीत बॅन्ड पथक यांच्या सहभागातून निघालेल्या या मिरवणुकीत शिवरायांची १८ फुटी सुंदर व देखणी मूर्ती आकर्षणाचा विषय ठरली होती. नवी पेठ, मेसॉनिक चौक, पांजरापोळ चौक, बाळीवेस, मधला मारूती, माणिक चौक, दत्त चौकमार्गे ही मिरवणूक रात्री शिंदे चौकात पूर्वस्थळी परतली.
या मिरवणुकीत महामंडळाचे अध्यक्ष राजकुमार काकडे यांच्यासह महापौर प्रा.सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, पालिका सभागृह नेते संजय हेमगड्डी,  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोहर सपाटे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, दास शेळके, विजय परदेशी, सुनील रसाळे, विजय पुकाळे, अर्जुन सुरवसे, शाहू शिंदे, प्रभाकर भोजरंगे, राजेंद्र घुले आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रभू प्रतिष्ठानच्या वतीने पार्क चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सुंदर ऐतिहासिक विषयावरील प्रतिकृतींची पाश्र्वभूमी लाभलेल्या रथावर शिवरायांची मूर्ती स्थानापन्न होती. सेनेचे गणेश वानकर यांच्या अधिपत्याखाली शिवप्रकाश प्रतिष्ठानची मिरवणूकही भव्य होती. याशिवाय क्रांती तालीम तरुण मंडळ, शिव-संदेश तरुण मंडळ, खड्डा तालीम, पापय्या तालीम, जय महाराष्ट्र तरुण मंडळ अशा अनेक मंडळांचा या मिरवणुकीत सहभाग होता. या मिरवणुकीत भव्य व आकर्षक देखाव्यांचे नवे परिमाण मिळाल्याचे पाहावयास मिळाले.
शिवजयंतीनिमित्त पांजरापोळ चौकातीलर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अनेक संस्था व संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून शिवविचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष फारूख शेख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या शिवविचार प्रबोधन फेरीत भगव्या ध्वजाबरोबर हिरवे ध्वजही डौलाने फडकत होते. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा लढा हा मुस्लिमांविरूध्द नव्हता, तर सरंजमदारी जुलमी राजवटीच्या विरोधात होता. छत्रपतींच्या सोबत मदारी मेहतर, नूरखान बेग, इब्राहीम खान, सिद्दी हिलाल, दर्यासारंग हे महत्त्वाचे शिलेदार होते. हा इतिहास सर्वाना ज्ञात व्हावा आणि त्यातून मूलतत्त्ववादी शक्तींना उत्तर मिळावे या हेतून काढण्यात आलेल्या या प्रबोधनफेरीत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आदींचा सहभाग होता. निवृत्त पोलीस अधिकारी मुसाअली खान, अ‍ॅड. महिबूब कोथिंबिरे, श्रीकांत घाडगे, अन्वर सैफन आदींचा या फेरीत प्रामुख्याने सहभाग होता. महिलांचा सहभागही उल्लेखनीय होता.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात
in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात