उरी येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारने कोणतीही दयामाया न दाखवता पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले होते. दुसरीकडे शिवसेनेच्या सूरत येथील कार्यकर्त्यांनी पाकिस्तानमध्ये फिदायीन अर्थात मानवी बॉम्ब बनून घुसण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच सीमवेर लढत असलेल्या जखमी सैनिकांसाठी अवयवदानाची इच्छा ही त्यांनी व्यक्त केली असल्याचे वृत्त ‘पुणे मिरर’ या इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.
शिवसेनेच्या २८ कार्यकर्त्यांनी आपण मानवी बॉम्ब बनून पाकिस्तानमध्ये जाण्यास तयार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले असल्याची माहिती सूरतचे शिवसेना शहराध्यक्ष अरूण कलाल यांनी दिली. या निवेदनात जखमी सैनिकांसाठी अवयवदानाची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनावर २८ शिवसैनिकांनी आपली स्वाक्षरी केली आहे.
आम्ही मानवी बॉम्ब बनून पाकिस्तानला नेस्तनाबूत करून शहीद झालेल्या सैनिकांचा बदला घेऊ असा विश्वास अरूण कलाल यांनी व्यक्त केला.
जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तर आपल्या सैनिकांना रक्ताची गरज भासेल. कदाचित मानवी अवयवांचीही आवश्यकता पडेल. अशाप्रसंगी आम्ही अवयवदानास तयार अाहोत असे आम्ही निवेदनात म्हटल्याचे पक्षाचे सूरत शहराचे उपाध्यक्ष विलास पाटील यांनी सांगितले. पंतप्रधान, संरक्षण मंत्री, राष्ट्रपती, गुजरातचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच निवेदन दिल्याचेही पाटील यांनी आवर्जून सांगितले.