भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विसर पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यातला राग अजूनही गेलेला नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर बसून त्यांच्याशी संवाद साधण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी यातून भाजपची फजितीच होण्याची शक्यता अधिक आहे, असे शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचे म्हणणे आहे.

राज्य सरकारने केलेल्या कामासंबंधी माहिती पोहोचवण्यासाठी गुरुवारपासून भाजपच्या ‘शिवार संवाद उपक्रमा’ला सुरुवात झाली. रावसाहेब दानवे हे येत्या २८ मे रोजी अमरावती जिल्ह्यात सभांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या पाश्र्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आनंदराव अडसूळ यांनी कर्जमुक्ती न करता, शेतकऱ्यांशी संवाद साधण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

कुठल्याही नावाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तरी ‘बुंद से गई वो हौदसे नही आती’ हा त्यातला प्रकार आहे. एका जबाबदार व्यक्तीने कुठलेही वक्तव्य फार विचारपूर्वक केले पाहिजे. तुम्हाला तर संताप व्यक्त करण्याचा अधिकारच नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपण निवडून येतो, वेगवेगळी पदे उपभोगतो, त्यांच्याशी ही प्रतारणा आहे. मग, कुणीही त्यातून अर्थ काढू शकतो, मग ही सत्तेची मस्ती आहे, असेही बोलेले जाते. शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत संवेदनशील आहेत, असे आनंदराव अडसूळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

त्यांचे स्वागत करण्याचा प्रश्नच येत नाही. एक तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी जे वक्तव्य केले, त्यावर वेगवेगळया ठिकाणाहून प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आता त्याला अजून रंग देणे आपल्याला संयुक्तिक वाटत नाही. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. शेतकरी एकदा तरी पूर्णपणे कर्जमुक्त झाला पाहिजे. ज्यावेळी एखादा माणूस आजारी पडतो आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येते, तेव्हा सलाईन दिले जाते, ते त्याला ‘नॉर्मल’ करण्यासाठी असते. त्याप्रकारे कर्जमुक्ती हा एक सुरुवातीचा उपाय आहे. हा कायमचा उपाय नाही. पण, एकदा शेतकऱ्याच्या डोक्यातून हे निघाले पाहिजे की, आपल्यावर कर्ज नाही. आपल्याला सत्तेत संधी मिळाली आहे. आपण आश्वासन दिले उत्तरप्रदेशात प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्जमाफीचे आश्वासन देतात आणि त्यांचे सरकार येताच आठच दिवसात कर्जमाफीचा निर्णय घेतला जातो. जर एवढय़ा मोठय़ा राज्यात कर्जमाफी होते, तर हा दुजाभाव केल्यासारखे आहे. तुम्हीच आश्वासन दिले आहे, आता जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. शिवसेनेची मागणी आहे, म्हणून ते करायचे नाही, असे आहे का, असा सवाल अडसूळ यांनी केला. दानवे यांच्या सभेला विरोध करायचा प्रश्न उद्भवत नाही आणि त्यांच्या सभेलाही जाण्याचा प्रश्न नाही. शिवसेने कर्जमुक्तीसाठी लढा उभारला

आहे. आम्ही कर्जमुक्ती करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही एक कार्यक्रम राबवतो, म्हणून त्यांनी दुसरा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यांची शिवार संवाद सभा आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर बसून ते शेतकऱ्यांशी चर्चा करतील, पण शेतकऱ्यांच्या डोक्यात अजूनही राग आहे. त्यांची या सभांमधून फजितीच होण्याची शक्यता अधिक आहे, असे आनंदराव अडसूळ म्हणाले.