छत्रपती शिवाजी महाराज आणि रामाच्या नावाने राजकारण करणारी मंडळी स्वत:चाच विकास करत आहेत. या दैवतांच्या नावावर पैसा गोळा करत असल्याची रोखठोक टीका माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना-भाजपचे नाव टाळत केली. सर्वागीण विकास करून देशाची कर्तृत्ववान पिढी निर्माण करण्याची धमक फक्त काँग्रेसमध्येच असल्याचे राणे म्हणाले.
आंबेगाव येथील श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिर जीर्णोद्धार प्रसंगी नारायण राणे यांनी मंदिर, देवतांचे पावित्र्य राखताना संगणक युगाचे भान ठेवून तरुणांना शिक्षण द्यावे, असे आवाहनदेखील केले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, देवस्थानचे वासुदेव परब, काँग्रेस तालुका अध्यक्ष संजू परब, सभापती प्रमोद सावंत, प्रेमानंद देसाई, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर आदी उपस्थित होते.
आंबेगाव परिसर निसर्गरम्य अतिसुंदर आहे. या आनंदी कार्यक्रमात लोकांचे चेहरे आनंदी आहेत. पालकमंत्र्यासारखे नाही, त्यांचा चेहरा कायमच रडका असतो असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांचे नाव टाळत लगावला. सत्ता कोणतीही असो विकास थांबणार नाही. आपला विकास करण्यास समर्थ आहोत असेही राणे म्हणाले.
हिंदू माणूसाची मंदिर, दैवतावर श्रद्धा आहे. तुम्ही देव, मंदिराला जेवढे महत्त्व देता तेवढेच महत्त्व शिक्षणाला द्या. संगणकाचे धडे येथे विद्यार्थ्यांना द्या. संगणकीय तंत्रज्ञानाचे शिक्षण ही काळाची गरज असून उद्याची युद्धेदेखील संगणकीय तंत्रज्ञानाची क्रांती ठरेल. आता या कॉम्प्युटरमुळे सर्व सहज शक्य आहे. विद्यार्थ्यांना या शिक्षणाची ओळख करून द्या. आजची मुले शार्प आहेत, त्यांना कर्तृत्ववान घडविण्यासाठी प्रयत्न करू या, असे नारायण राणे म्हणाले.
राजकारणासाठी काही लोक दैवतांचा दुरुपयोग करताहेत, गंगेचे पाणी भारतभर फिरवून पैसे गोळा करणारी माणसे रामाच्या नावाचाही राजकारणासाठी दुरुपयोग करताहेत, असा भाजपला टोला हाणत, महागाई कमी करून अच्छे दिन आणणार होते त्याचे काय झाले, असा प्रश्नदेखील राणे यांनी विचारला.
आमदार, पालकमंत्र्यांनी जिल्ह्य़ाचा विकास काय केला? आज शिक्षक, डॉक्टर जिल्ह्य़ात नाहीत. केरगावात माकडताप आला, त्यांच्या सेवेसाठी आम्ही धावलो. हे कुठे आहेत असा अप्रत्यक्ष पालकमंत्री दीपक केसरकरवर राणे यांनी प्रहार केला. पर्यटन, प्रक्रिया उद्योग, सी-वर्ल्ड, विमानतळ आणण्याच्या आमच्या संकल्पाला त्यांनी हरताळ फासला असल्याची टीका करत मुंबई-गोवा हायवे माझ्या व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने होत आहे. भाजप फक्त ठेकेदार नेमून पैसे कमविण्याचे काम करील, असे राणे म्हणाले.
देवगडला एक लाख नोकऱ्या देणारा रिफायनरी उद्योग आणला जाणार असल्याचे सांगणाऱ्यांनी अद्यापि जमीनही घेतली नाही. कोकणात अणू ऊर्जा, पेट्रोलियम प्रकल्प कशासाठी आणताहेत, असा प्रश्न करत राणे यांनी इंजिनीअिरग, टेक्साटाइल, अ‍ॅटोमोबॉइलसारखे प्रकल्प आणा. सुरेश प्रभूंनी रेल्वेचा वर्कशॉप आणावा, असे आवाहन नारायण राणे यांनी केले. रत्नागिरीत मुख्यमंत्री आले आणि गेले. त्यांना कोकणच्या शाश्वत विकासाशी देणे घेणे नाही, असे राणे म्हणाले.
जिल्हा नियोजन मंडळ बैठकीच्या आराखडय़ावर पाच महिने सही करण्यास पालकमंत्र्याला वेळ नाही. हा पालकमंत्री नियोजनच्या बैठकीतून उठून जातो. रस्ते व नळपाणी योजना दुरुस्त होत नाहीत अशी टीका पालकमंत्री केसरकर यांच्यावर करत, मी उद्योगमंत्री असताना राज्यातील चार हजार तरुणांना उद्योगासाठी भूखंड दिले. हे साधे उभेही राहू शकत नाहीत, असा टोला राणे यांनी हाणला. महिलांनी उद्योग करावेत म्हणून ओसरगाव येथे उपक्रम हाती घेतला, असे राणे म्हणाले.
जिल्ह्य़ात रेशनिंगवर धान्य नाही, डॉक्टर नाहीत, शिक्षक नाहीत. जनता संतापाने उठून अन्याय करणाऱ्यांच्या गालावर आवाज काढत नाही तोवर परिवर्तन होणार नाही, असे नारायण राणे यांनी सांगून, मी इंजिनीअिरग कॉलेज, मेडिकल कॉलेज, कृषी कॉलेजसारखे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. काँग्रेस सोडून अन्य सर्व पक्षांनी एकत्रित येऊन एक कॉलेज काढून चालवून दाखवावे, असे आवाहन नारायण राणे यांनी विरोधकांना दिले.
कोकणात दुसरा नारायण राणे शोधा, असा नारायण राणे कोकणाला शोधूनही सापडणार नाही, असे राणे यांनी सांगून छत्रपती शिवाजी महाराज व रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी विकास, सेवा, शिक्षण, आरोग्य व जनतेचा विकास करून कर्तृत्ववान माणसे घडवावीत, असे आवाहन शिवसेना-भाजपचे नाव टाळत केले.
या वेळी जिल्हा काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी पालकमंत्री म्हणजे बालकमंत्री असल्याची टीका करत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री असताना केलेल्या कामांची जंत्रीच वाचली.
या वेळी वासुदेव परब व ग्रामस्थांनी उपस्थितांचे स्वागत केले. सभापती प्रमोद सावंत, राजन भगत यांनीदेखील राणे यांचे स्वागत केले. आंबेगाव शाळा क्र.१च्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे राणेंनी स्वागत करून बक्षीस दिले.