दलित वस्तीमध्ये एक दुमजली घर, विठ्ठल-रुक्मिणी निवास. घरावर निळय़ा झेंडय़ावर पतंगाचे चित्र. पतंग हे चिन्ह एमआयएमचे. ते घर अशा व्यक्तीचे ज्याला पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायद्याखाली पकडलेले. तेथे ओवेसींचे छायाचित्र असणारी पाटी. ते प्रचाराला येतात. त्यांच्यावर अक्षरश: फुले उधळली जातात. हे चित्र एकीकडे. दुसऱ्या बाजूला नाराज मुस्लीम नेत्यांकडून त्यांना काळे झेंडे दाखवले जातात. शहराच्या काही भागांत ‘शेर आया’ या घोषणा. मोठा जमाव आला की ‘नारा ए तकबीर’ अशी घोषणा होते. शहराच्या दुसऱ्या भागात गळय़ात गमछे घातलेले तरुण. मनगटी वेगवेगळय़ा रंगांचे दोरे. दुचाक्यांचे हॉर्न वाजत राहतात. कोणी तरी मोठय़ांदा घोषणा देतो ‘जयऽऽ भवानी’. प्रतिसादादाखल मोठा आवाज येतो ‘जयऽऽ शिवाजी’!
प्रचारादरम्यान शहरातील हे चित्र संवेदनशील माणसाला हलवून टाकणारे. रंगाची प्रतीकात्मकता राजकारणाचा पोत सांगणारी. या सर्व वातावरणात काँग्रेस एकाकी. पंजा चिन्हाची रिक्षा कधी तरी गल्लीत दिसते, तर राष्ट्रवादीचे घडय़ाळ पोस्टरवरच. प्रचाराचा असा नूर औरंगाबाद पालिका निवडणुकीचे अंतरंग उलगडविण्यास पुरेसा ठरावा.
या निवडणुकीत सेनेतील वादही चव्हाटय़ावर आले. स्थानिक पातळीवर अगदी लहानशा बाबींवर लक्ष घालणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरे हे जाहीरनामा प्रकाशनाच्या पत्रकार बठकीत अवाक्षरही बोलले नाहीत. सगळा कारभार पालकमंत्री रामदास कदम यांनी हाती घेतला. ज्या ६० वॉर्डात एमआयएमचे उमेदवार उभे आहेत तेथेही तेवढीच बंडखोरी आहे. त्यामुळे ही निवडणूक युती विरुद्ध त्यांचे बंडखोर आणि एमआयएम विरुद्ध त्यांचे बंडखोर अशी होण्याची शक्यता आहे. निवडणूक जिंकली तर माझ्यामुळे आणि हरलो तर खापर कोणावर फोडायचे, हे ठरवून सारी गणिते मांडली जात आहेत.
जसे शिवसेनेत, तसेच भाजपमध्ये आहे. प्रदेशाध्यक्षांनी विश्वासात घेतले नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. निवडणुकीच्या फडात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस तशी निष्प्रभ ठरेल असेच चित्र आहे, तर राष्ट्रवादीचीही दाणादाण उडेल, असाच प्रचाराचा नूर होता. कुरघोडय़ांच्या खेळात दलित-मुस्लीम हा पिचलेला समाज एक झाला तर, या भीतीने सुरू झालेले राजकारण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या समस्या जाहीरनाम्याच्या गुळगुळीत कागदावर.

तिजोरीत खडखडाट!
* गेल्या २८ वर्षांपासून या महापालिकेवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व. महापालिकेच्या गंगाजळीत नेहमीचा खडखडाट. कर देण्यास नागरिक तयार नाहीत असे नाही. कर गोळा करणारी यंत्रणाच कुचकामी. निवृत्त सनदी अधिकारी कृष्णा भोगे औरंगाबाद महापालिकेच्या अनागोंदी कारभारावर नेमकेपणाने बोट ठेवतात.
* भ्रष्टाचार ही खरी समस्या आहे, ती दूर करण्याचा कोणीच प्रयत्न करीत नाही. पर्यटनाची राजधानी, मर्सििडजचे शहर असे कोणी काही म्हटले तरी शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात युतीला अपयश आले.
* त्यामुळेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या भाषणातील बहुतांश वेळ इतिहासावर खर्च करावा लागला. तसे केले नाही तर एमआयएमची सत्ता येईल, अशी भीती दाखवत केलेला प्रचार एका बाजूला आणि दुसरीकडे भाजप-सेनेसमोर बंडखोरीचे आव्हान.
* ११३ पकी १११ वॉर्डात मतदान होणार आहे, कारण सेनेचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले. पकी २१ वॉर्डात बंडखोरी झाली. काही बडय़ा नेत्यांनी स्वत: गट चालविण्याचा चंग बांधला असल्यासारखे वातावरण आहे.

खासदारांना शह?
एमआयएमने दलितबहुल सात प्रभागांवर लक्ष केंद्रित केले होते, तर शिवसेनेत प्रचाराची धुरा मुंबईहून पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे होती. त्यामुळे शिवसेनेचा गड असलेल्या गुलमंडी भागातही त्यांनी सभा घेतली. एकप्रकारे खासदार चंद्रकांत खैरे यांना हा शह मानला जातो. पालकमंत्री झाल्यापासून औरंगाबादसाठी ३०० कोटी रुपये आणल्याचा दावाही कदम यांनी केला.
सुहास सरदेशमुख, औरंगाबाद