सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
राज्यात सत्तेवर असूनही भाजप व शिवसेना यांच्यात होणाऱ्या शाब्दिक चकमकीनंतर आता दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आणि घटस्फोटाची भाषा चालविली असली तरी दोघांनाही सत्ता प्रिय आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सत्तेतून बाहेर पडू शकत नाहीत, असा टोला काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला आहे.
मंगळवारी सोलापुरात काँग्रेस भवनात आयोजित एका कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना शिंदे यांनी भाजप व सेनेतील ताणलेल्या संबंधांवर भाष्य केले. या दोन्ही पक्षांनी एकमेकास ‘निजामाचे बाप’, ‘शोले’तील ‘असरानी’, ‘शकुनी मामा’ यासारखी विषेषणे लावून दूषणे दिली असली तरी ते सत्तेपासून दूर हटणार नाहीत. दोघे परस्परांशी रस्त्यावर येऊन भांडतील, एकमेकांचे पुतळे जाळतील, परंतु एकमेकांशी फारकत घेऊ शकत नाहीत, अशा शब्दात शिंदे यांनी भाजप-सेना युती ही सत्तापिपासू असल्याची टीका केली.
नरेंद्र मोदी यांनी केवळ खोटी आश्वासने व काँग्रेसवर खालच्या पातळीवर जाऊन टीकास्त्र सोडून सत्ता मिळविली असून त्यांनी गेल्या दोन वर्षांत चालविलेल्या कारभाराचा फोलपणा आता जनतेच्या लक्षात आला आहे. मोदी यांनी जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळविली असल्यामुळे ती अधिक काळ चालणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना शिंदे म्हणाले, परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा परत आणतो आणि त्यातून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या बँक खात्यावर प्रत्येकी १५ लाखांची रक्कम जमा करतो, अशी थाप मोदी यांनी मारली होती. १५ लाख रुपये आपल्या खात्यावर केव्हा जमा होणार, याचा जाब जनता आता विचारू लागली आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद हळूहळू वाढत चालल्याचा दावाही त्यांनी केला.
कितीही संकटे आली तरी काँग्रेस पक्ष यत्किचिंतही डळमळीत न होता ताठ मानेने उभा आहे, असे त्यांनी नमूद केले.