शिवसेना-भाजपमध्ये आता पालकमंत्रीपदावरून वाद सुरू झाला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांच्या पसंतीनुसार पालकमंत्रीपदे देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्याने आता त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा होणार आहे. मात्र ठाकरे यांनी बुधवारी नागपुरात येऊनही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाही.
 भाजपला सोयीचे जिल्हे घेतल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वाटय़ाला उर्वरित जिल्ह्य़ांची पालकमंत्रीपदे दिली जाणार आहेत.
पालकमंत्र्यांना अधिकार मोठे असतात आणि जिल्हा विकास कामांच्या निधीवाटपाचे अधिकारही असतात. त्यामुळे ज्या जिल्ह्य़ात भाजपला पक्ष बळकट करायचा आहे, तेथील पालकमंत्रीपदे भाजपकडे ठेवायची आहेत. ज्या जिल्ह्य़ात भाजप मजबूत आहे व तेथे प्रभावशाली नेते आहेत, तेथे पालकमंत्र्यांना फारसे काही करण्यास वाव राहणार नाही. त्यामुळे असे जिल्हे शिवसेनेच्या मंत्र्यांना दिले जातील.
भाजपच्या मंत्र्यांमध्येही काही जिल्ह्य़ांमध्ये पालकमंत्रीपदांसाठी रस्सीखेच आहे. जळगाव जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना हवे आहे, तर ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि एकनाथ शिंदे यांना हवे आहे. पालकमंत्रीपदाचा वाद सुटू न शकल्याने ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचे समजते.