सेना -भाजपने बांधकाम अधिकाऱ्यांना जाब विचारला

अलिबाग तालुक्यातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावरून राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. पावसाळा जवळ आला तरी रस्त्याची कामे होत नसल्याने सेना -भाजप नेत्यांनी शुक्रवारी बांधकाम अधिकाऱ्यांना जाब विचारला. महिन्याभरात रस्त्याच्या कामाला गती आली नाही तर अधिकाऱ्यांना गंभिर परिणामांना सामोर जावे लागेल. असा इशारा यावेळी दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळाने दिला.

अलिबाग रेवदंडा रस्त्याची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन रस्त्याच्या कामासाठी निधी प्राप्त झाला आहे. मात्र पावसाळा आला तरी रस्त्याच्या कामाला गती आलेली नाही. जे काम सुरु आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या प्रश्नांबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेना आणि भाजप पक्षाच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांची भेट घेतली. आणि रस्त्याची कामे पूर्ण कधी होणार. याबाबत जाब विचारला,

शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे, तालुका प्रमुख दिपक रानवडे, भाजपचे तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर आणि पंचायत समिती सदस्य उदय काठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. बांधकाम विभागाच्या उदासिनतेमुळे जनतेला वेठीस धरली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अलिबाग ते आक्षी दरम्यान सुरू असलेल्या रस्तेदुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. मात्र ठेकेदाराकडून बीएमचा थर न टाकताच थेट कारपेट टाकले जात असल्याचे यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तर नागाव येथे सुरू असलेले काँक्रीटीकरणाचे अतिशय संथ गतीने सुरू असून सात महिन्यांपासून या मार्गावरील एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि सामान्य माणसांचे हाल होत आहेत. हिच परिस्थिती कायम राहिली तर या पावसाळ्यात स्थानिकांसह प्रवाशांना मोठय़ा समस्येला तोंड देण्याची वेळ येणार असल्याचे सुरेंद्र म्हात्रे यांनी स्पष्ट केले.  कंत्राटदार कोण आहे, तो काम का करत नाही, बांधकाम विभागाचे अधिकारी काम करताना का उपस्थित राहात नाही. निविदेत नमुद केल्याप्रमाणे काम होत नसेल तर हे पाहण्याची जबाबदारी कोणाची, वर्षभरात रस्ते दुरुस्तीवर किती रुपये खर्च झाला, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर काय कारवाई केली. रस्त्याच्या कामासाठी मंजुर झालेला निधी, ठेकेदारांचे नाव, देखभाल दुरुस्तीचा कालावधी यांचे बोर्ड का लावले जात नाहीत. यांसारखे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. मात्र बांधकाम

विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची उत्तरे देता आली नाही. ठेकेदाराला बोलावून जाब विचारा असा आग्रह धरल्यावर सुप्रभात कन्स्ट्रक्शनचे सवाई पाटील कार्यालयात हजर झाले. सुरूवातीला मी ठेकेदार नाही मी फक्त साहित्य पुरवणारा असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला, मात्र सेना आणि भाजपचा आक्रमक पावित्रा बघितल्यानंतर पावसाळ्यापूर्वी शक्य तेवढे काम पूर्ण करण्याची हमी दिली. अखेर कुठल्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी रेवदंडा अलिबाग मार्गाचे काम मार्गी लावण्याची लेखी हमी बांधकाम

विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी शिष्टमंडळाला दिली. मात्र दिलेल्या मुदतीत काम केले नाही तर गंभिर परिणामांना सामोरे जावे लागेल. असा इशारा सेना- भाजप नेत्यांनी यावेळी दिला.

‘सात महिन्यांपासून या मार्गावरील एसटी सेवा बंद आहे. अलिबागहून मुरुडला जाताना जादा पसे मोजावे लागत आहे. आणि ठेकेदार काम करायला तयार नाहीत. जे काम होत आहे. ते निकृष्ट दर्जाचे आहे. रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही.’  सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख

‘संबंधित ठेकेदाराला रस्त्याच्या कामाला गती द्यावी. यासंदर्भात सुचना देण्यात आल्या आहेत. केलेल्या कामाबाबत आलेल्या तक्रारींची पडताळणी करण्याचे निर्देश ज्युनिअर इंजिनिअर यांना दिले आहेत, पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याचा प्रयत्न करू.’  व्ही. बी., कार्यकारी अभियंता, अलिबाग