रायगडात शिवसेनेला मोठा धक्का
उपजिल्हाप्रमुख ज्ञानदेव पवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, काँग्रेसचे सरचिटणीस माणिकराव जगताप, माजी आमदार मुश्ताक अंतुले, पंकज तांबे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मूळचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकत्रे असलेले ज्ञानदेव पवार यांनी शेकाप नेतृत्वाकडून योग्य न्याय मिळत नसल्याचे सांगत दीड वर्षांपूर्वी शेकापला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. शेकापमध्ये असताना ज्ञानदेव पवार यांनी २ वेळा जिल्हा परिषद सदस्य तसेच शिक्षण सभापतिपद भूषवले होते. सुनील तटकरे यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविण्यास ते इच्छुक होते. श्रीवर्धन मतदारसंघात कुणबी मतदारांची संख्या मोठी आहे.
कुणबी मतांवरच येथील जयपराजयाचे गणित अवलंबून असते. कुणबी समाजाचा असल्याने आपल्याला श्रीवर्धनमधून उमेदवारी मिळेल अशी पवार यांना अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. त्यांच्याऐवजी तत्कालीन उपजिल्हाप्रमुख रवी मुंढे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली.
तेव्हापासूनच ज्ञानदेव पवार नाराज होते. त्यानंतर त्यांचे पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाशी अनेकदा खटके उडत होते.
पुढे त्यांचे पक्षात कुणाशीही जमेनासे झाले त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार काँग्रेसचे सरचिटणीस माणिकराव जगताप यांच्या माध्यमातून त्यांनी आज मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ज्ञानदेव पवार यांच्याबरोबरच महाडचे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव यांनीही आज काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला.