कारखान्यातील निवृत्त कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतरचे लाभ द्यावेत, या बाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे, तसेच व्यवस्थापकीय संचालक भीमराव डोके या दोघांना कामगार न्यायालयाने दोन महिन्यांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. या निकालाविरोधात दाद मागण्याचे आमदार भुमरे यांनी ठरविले आहे.
कारखान्यातील निवृत्त कर्मचारी शेख गफूर शेख हुसेन यांनी या बाबत कामगार न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायाधीश ए. ए. आपटे यांनी या प्रकरणी वरील निकाल दिला. शेख गफूर हे २००५मध्ये कारखान्यातून निवृत्त झाले. मात्र, कारखान्याने त्यांना निवृत्तीनंतरचे लाभ दिले नाहीत. त्यामुळे त्यांनी २ मार्च २००९ रोजी कारखान्याविरोधात औद्योगिक न्यायालयात तक्रारअर्ज दाखल केला होता. त्यावर निकाल देताना न्यायालयाने कारखान्यास तक्रारदाराला २ लाख ६६ हजार १४५ रुपये रक्कम ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्याचे पालन न झाल्याने शेख गफूर यांनी अ‍ॅड. रमेश इमले यांच्यामार्फत कामगार न्यायालयात याचिका दाखल केली होती.