शिवसैनिकांचे आंदोलन

नगरपालिका चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद होऊन रविवारी शिवसैनिकांनी व्यापारी संकुलासमोर प्रतीकात्मक पुतळा बसवला. या वेळी शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पुतळा बसविल्यानंतर लगेचच शिवसैनिक परतल्याने वाद निवळला.

पालिकेच्या जुन्या इमारतीवर असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद सुरू आहे. पालिकेची इमारत पाडली गेल्याने हा पुतळा प्रस्तावित इमारतीवर बसविला जाणार असल्याची घोषणा सत्ताधारी काँग्रेसने केली होती, परंतु नवीन जागेबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने दोन वर्षांपासून इमारतीचे काम सुरू झालेले नाही. पुतळा सध्याच्या जयप्रकाश नारायण इमारतीत अडगळीत असल्याचा आरोप करीत हा पुतळा पालिका चौकातील नवीन व्यापारी संकुलासमोर बसविण्याची मागणी शिवसेनेने केली होती. परंतु महापुरुषांचे पुतळे परवानगीशिवाय चौकांमध्ये बसविता येणार नसल्याचे तसेच हा पुतळा पालिका इमारतीवर असल्याने तो पालिकेच्या नव्या इमारतीवर बसवला जाईल, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. यावर अनेक बैठका झाल्या, परंतु तोडगा निघू शकला नाही. त्यामुळेच या चौकात पालिकेतील जुना पुतळा बसविण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता.

रविवारी शिवसैनिकांनी महाराजांचा नवीन पुतळा आणत पालिका चौकात बसविण्याचे ठरविले होते. याची कुणकुण लागल्याने पोलिसांनी चौकात बंदोबस्त तैनात केला होता.

पोलिसांनी शिवसैनिकांकडून पुतळा ताब्यात घेत गाडीत ठेवला. शिवसेनेने याविरोधात आक्रमक भूमिका घेताच पोलिसांनी पुतळा पुन्हा शिवसैनिकांच्या ताब्यात दिला. या वेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापटही झाली. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत एका ठिकाणी पुतळा स्थानापन्न केला. या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने उपस्थितही चकित झाले.

जो पुतळा अडगळीत पडल्याचा आरोप शिवसेनेने केला, तो पुतळा या चौकात बसविण्याऐवजी लोखंडी मचाणवर नवीन पुतळा बसविल्यानेही आश्चर्य व्यक्त होत आहे. जुना पुतळा अद्यापही पालिकेत आहे.

जिल्ह्य़ात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असताना शिवसेनेने केलेले आंदोलन आणि नवीन बसविण्यात आलेल्या पुतळ्याबाबत पोलीस वरिष्ठ स्तरावर चर्चा करून कारवाईबाबत निर्णय घेणार आहेत.