जामखेड नगरपालिकेत भाजप नेते व राज्यमंत्री शिंदे एकाकी
राज्यात शिवसेनेला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीचा वापर करत असला तरी जामखेड नगरपरिषदेमध्ये मात्र पालकमंत्री राम शिंदे यांना व त्यांच्या माध्यमातून भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेच्या ४ नगरसेवकांनी राष्ट्रवादीशी घरोबा करत अपक्षांसह गटनोंदणी करीत भाजपला एकाकी पाडले आहे. या नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती होती. मात्र माजी राज्यमंत्री सुरेश धस व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी यांनी नंतर युतीमध्ये सुरुंग लावत शिवसेनेला आपल्या बरोबर घेतले आहे.
जामखेड येथील पहिल्या नगराध्यक्षाची निवडणूक येत्या सोमवारी (दि. ८) होणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत येथे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. मात्र २१ पैकी सर्वाधिक म्हणजे १० जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. भाजपची मोठीच पिछेहाट झाली असून त्यांना अवघ्या तीन जागा
मिळाल्या आहेत.
शिवसेना- ४, मनसे- १ आणि अपक्ष- १, असे संख्याबळ येथे आहे. राष्ट्रवादीने सुरुवातीलाच दोन अपक्षांना बरोबर घेत सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. या अपक्षांसह १२ सदस्यांची गटनोंदणी त्यांनी केली होती. तरीही नगराध्यक्ष निवडीच्या वेळी चमत्कार होतील, अशा वल्गना पालकमंत्री राम शिंदे यांनी केल्या आहेत.
मात्र आता शिवसेनेनेही राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने भाजपची चांगलीच अडचण झाली आहे.

‘स्वीकृत’वरून युतीत बिनसले
भाजप-शिवसेना युतीत स्वीकृत नगरसेवकांवरून बिनसल्याचे सांगण्यात येते. सदस्य संख्या अधिक असल्याने स्वीकृत नगरसेवकावर शिवसेनेने दावा केला होता. मात्र भाजपने परस्पर मनसे व एका अपक्षाला बरोबर घेऊन पाच सदस्यांची गटनोंदणी करीत शिवसेनेवर कडी करण्याचा प्रयत्न केला. त्याने संतप्त झालेल्या शिवसेनेने थेट राष्ट्रवादीशीच संधान साधून सत्तास्थापनेसाठी आघाडी स्थापन करून त्यांच्या समवेतच गटनोंदणी केल्याने हे संख्याबळ आता सोळावर गेले आहे. त्यामुळे पालकमंत्री शिंदे यांचे सगळेच मनसुबे उधळले आहेत.