शिवसेनेचा अणुऊर्जा प्रकल्पाला तत्त्वत: विरोध नाही, परंतु जैतापूरमधील प्रस्तावित प्रकल्पाला केवळ सुरक्षिततेच्या मुद्दय़ावरून विरोध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी बुधवारी येथे केले. विशेष म्हणजे राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही अलीकडेच जैतापूर प्रकल्पाला सेनेचा विरोध नसल्याच्या आशयाचे वक्तव्य केले होते. या पाश्र्वभूमीवर गीते यांचे हे प्रतिपादन सेनेच्या मूळ भूमिकेत बदल होऊ लागल्याचे निदर्शक मानले जात आहे.
केंद्र सरकारच्या वाटचालीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजप-सेना युतीतर्फे बुधवारी येथे जनकल्याण पर्व मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर बोलताना गीते म्हणाले की, अणुऊर्जेला शिवसेनेचा विरोध नाही. पण जैतापूरचा परिसर भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये मोडतो. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावरील या प्रकल्पाला दहशतवादी कारवायांचाही धोका आहे, हे लक्षात घेऊन केवळ सुरक्षिततेच्या मुद्दय़ावरून शिवसेनेने या प्रकल्पाला सातत्याने विरोध केला आहे. फुकुशिमा येथील दुर्घटनेनंतर अणुऊर्जा प्रकल्पांना युरेनियम पुरवणाऱ्या देशांनीही हे प्रकल्प बंद केले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याशी सेनेच्या खासदारांनी केलेल्या चर्चेत याच मुद्दय़ांवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी त्याबाबत तज्ज्ञांचे मत घेण्याचे आश्वासन दिले आहे. प्रकल्पाच्या सुरक्षिततेची हमी मिळाल्यास सेना माघार घेईल काय, असे विचारले असता, याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे उत्तर गीते यांनी दिले. तसेच रामदास कदम यांनी याच स्वरूपाचे वक्तव्य केले होते, याकडे लक्ष वेधले असता, त्याबाबतचा तपशील माहीत नसल्याचे ते म्हणाले.

अणुऊर्जेला शिवसेनेचा विरोध नाही. पण समुद्रकिनाऱ्यावरील या प्रकल्पाला दहशतवादी कारवायांचा धोका आहे. त्यामुळेच केवळ सुरक्षिततेच्या मुद्दय़ावरून शिवसेनेने या प्रकल्पाला सतत विरोध केला आहे.
 – अनंत गीते