आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आम्ही खपवून घेणार नाही. जर शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याचे दिसले तर या सरकारचे काय करायचे ते आम्ही बघू असा धमकीवजा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. नाशिकमधील शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकावर निशाणा साधला. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे वचन मी देत असून शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ देणार नाही. ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांची यादी आमच्याकडे द्यावी आम्ही ते गुन्हे रद्द करवून घेऊ असे आश्वासनही उद्धव ठाकरेंनी दिले. शेतकरी कर्जमाफीचे श्रेय शिवसेनेचेच आहे असा दावाही त्यांनी केला. उद्धव ठाकरे हे पुणतांबा गावातील शेतकऱ्यांशी आणि पिंपळगाव-बसवंत, निफाड, येवला, कोपरगावमधील शेतकऱ्यांशी रविवारी संवाद साधतील.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शेतकरी तसेच विरोधी पक्षांचे आंदोलन आणि सत्तेतील सहभागी शिवसेनेच्या ताठर भूमिकेमुळे चौफेर अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारने शनिवारी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्यातील सुमारे ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार २२ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा सरकारने केली होती. १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.