सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना कोकणात मात्र धांदल आहे भातकापणीची. कारण दिवाळीच्या मुहूर्तापेक्षाही ही पर्वणी साधणं महत्त्वाचं. पण यंदा त्याच काळात इथे नगर परिषदा-पंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यांचं मुख्य क्षेत्र शहरी असलं तरी ही शहरेही कृषिसंस्कृतीपासून अजून पूर्णपणे तुटलेली नाहीत. त्यामुळे इथल्या राजकीय पक्षांना त्याचं भान ठेवत निवडणुकांचे धोरण पुढे रेटावे लागत आहे. तसे पाहिले तर कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्य़ामध्ये १९९० च्या विधानसभा निवडणुकांपासून शिवसेनेने जम बसवला. पण या दशकाच्या सुरुवातीला चिपळुणात या पक्षाचे माजी आमदार भास्कर जाधव यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आणि त्यापाठोपाठ सिंधुदुर्गात ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने सेनेच्या किल्ल्याला खिंडार पडले आणि त्यांचं प्रतिबिंब इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही पडू लागलं. त्याचबरोबर भाजप मात्र दुबळा होत गेला.

भाजपची ताकद कमी

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यभर यश मिळाले, सत्ता मिळाली तरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे अपवाद ठरले. या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये भाजपचा एकही आमदार निवडून आला नाही. यामुळेच भाजपने बाहेरचे मासे गळाला लावून यशासाठी कंबर कसली आहे. दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपचा रस्ता पकडला. रत्नागिरी जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचा एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

रत्नागिरी जिल्ह्य़ात राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या चार नगर परिषदा व दापोली नगर पंचायतीची निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. त्यापैकी सत्ताधारी भाजप-सेनेच्या शह-काटशहाच्या राजकारणामुळे रत्नागिरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील गटबाजीमुळे चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीकडे जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे. मावळत्या सभागृहात युतीकडे २८ पैकी २३ जागांची भक्कम आघाडी असली, तरी करारानुसार भाजपने नगराध्यक्षपद न सोडल्यामुळे आता हेच दोन पक्ष एकमेकांचे मुख्य विरोधक झाल्याचे चित्र आहे. आदेशावर चालणारा पक्ष, अशी शिवसेनेची ख्याती असली तरी मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करून निवडून आलेले आमदार उदय सामंत यांचा समर्थक गट आणि जुने निष्ठावंत यांच्यात छुपी रस्सीखेच आहे. त्यातच यंदाची ही निवडणूक स्वबळावर लढण्याचे नारे दोन्ही बाजूंनी दिले आहेत. पण या राजकीय परिस्थितीचा लाभ उठवू शकेल, असा नेता आणि कार्यकर्ते विरोधकांकडे नाहीत. जिल्ह्य़ाप्रमाणे शहरातही कॉंग्रेसची प्रकृती तोळा मासा असल्यामुळे  पक्षाचे स्थानिक नेतेच उमेदवारांच्या शोधात असल्यासारखी स्थिती आहे, तर राष्ट्रवादीचे सर्व राजकारण माजी नगराध्यक्ष आणि या पदासाठी पक्षाचे उमेदवार उमेश शेटय़े यांच्याभेवतीच फिरत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि तसे झाल्यास येथेही कल्याण-डोंबिवली पॅटर्न अवलंबला जाऊ शकतो.  चिपळूण नगर परिषदेत मागील निवडणुकीत २८ जागांपैकी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने २० जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले. पण येत्या निवडणुकीत माजी आमदार रमेश कदम यांच्याकडे पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीची सर्व सूत्रे सोपवल्यामुळे त्यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक व जिल्हा प्रभारी भास्कर जाधव आणि जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी संपूर्ण जिल्ह्य़ाच्या उमेदवार निवड प्रक्रियेतून अंग काढून घेतले आहे. याचा फायदा भाजप-सेनेला होण्याची चिन्हे आहेत.

राजापुरात मागील निवडणुकीमध्ये काठावरच्या बहुमताच्या आधारे सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस आघाडीला यावेळी ती संधी मिळू न देण्यासाठी सेनेचे आमदार राजन साळवी यांची ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर कोकणात मनसेची एकमेव आशा असलेल्या खेडमध्ये सेनेचे ज्येष्ठ मंत्री रामदास कदम येथे आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत.

 सिंधुदुर्गात चित्र अस्पष्ट

कोकणचे नेते म्हणवणाऱ्या ज्येष्ठ कॉंग्रेस नेते नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्य़ात आजतागायत अजिबात प्रभव पाडता आलेला नाही. पण कनिष्ठ चिरंजीव आमदार नितेश यांच्या साहाय्याने सिंधुदुर्गचा गड  टिकवून धरण्याचा ते नेटाने प्रयत्नकरत आहेत. या जिल्ह्य़ातील सावंतवाडी, मालवण आणि वेंगुर्ले या तीन नगर परिषदा व देवगड-जामसंडे नगर पंचायत निवडणुकीसाठी अजून तरी चित्र अस्पष्ट आणि धूसर आहे.  इतिहास लक्षात घेता राष्ट्रवादीतून सेनेमध्ये जाऊन सध्या राज्यमंत्री असलेल्या दीपक केसरकरांची सावंतवाडीवर पकड कायम राहील, असा होरा आहे, तर मालवणात राणेंच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस आघाडीकडे काठावरच्या बहुमताच्या आधारे असलेली सत्ता हिसकावून घेण्यासाठी त्यांचे जिल्ह्य़ातील परंपरागत मुख्य राजकीय विरोधक व सेनेचे आमदार वैभव नाईक निकराचे प्रयत्न करतील, हे उघड आहे. वेंगुल्र्यात राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष प्रसन्न कुबल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तेथे या पक्षाला येत्या निवडणुकीत आणखी पकड बसवण्याची संधी मिळाली आहे. पण केसरकरांच्या सेनाप्रवेशानंतर जिल्ह्य़ात मोठा फटका बसलेली राष्ट्रवादी अजून त्या धक्क्य़ातून सावरलेली नाही.