रस्त्याचे खड्डे आठ दिवसांत भरा नाही तर अधिकाऱ्यांना डांबर फासणार

अलिबाग तालुक्याला जोडणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, आठ दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती केली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा या वेळी शिवसेना नेते सुरेंद्र म्हात्रे आणि तालुका अध्यक्ष दीपक रानवडे यांनी दिला.

तालुक्यातील रेवस-अलिबाग, रेवदंडा-अलिबाग, रोहा-अलिबाग आणि वडखळ-अलिबाग या रस्त्यांची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. खराब रस्त्यांमुळे अपघात होत आहेत. वाहन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांना पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी यांसारखे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे रस्त्यांची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

ही बाब लक्षात घेऊन सोमवारी तालुका प्रमुख दीपक रानवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालयाला भेट दिली. या वेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे उपस्थित होते. कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी देशपांडे शिष्टमंडळाला सामोरे गेले. या वेळी उपस्थित शिवसनिकांनी रेवदंडा अलिबाग रोडच्या दुरवस्थेवरून अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आठ दिवसांत रस्त्यांच्या दुरुस्तीची काम पूर्ण न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल आणि अधिकाऱ्यांना डांबर फासले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.