जैतापूर अणुउर्जा प्रकल्पावरुन शिवसेना आणखी आक्रमक होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या खासदारांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाला असलेल्या आक्षेपांविषयी विचार करण्याचे आणि शास्त्रीय माहिती पुन्हा तपासण्याचे आश्वासन दिले होते, पण शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता प्रकल्प पुढे रेटण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हा प्रकल्प रद्द करण्यासाठी सविस्तर पत्र पाठविले. प्रकल्पाविषयक विविध संस्थांचे अहवाल, सद्यस्थिती, परिसरातील नागरिकांचे आक्षेप आदी सर्व कागदपत्रे पाठविण्यात आली आहेत; मात्र शिवसेनेच्या विरोधाला फारशी किंमत न देता हा प्रकल्प होईलच. प्रकल्पासाठी सर्व तयारी सुरु आहे, असे भाजपमधील सूत्रांनी स्पष्ट केले.