खरा शिवाजी समजावून सांगण्याचा ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा उद्देश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या नाटकाचे प्रयोग गावोगावी होणे आवश्यक आहे, ही समाजाची गरज असल्याचे मत येथे आयोजित परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केले. मुंबई, पुण्याबाहेरील असूनही सदैव चर्चेत राहिलेल्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ असे लांबलचक नाव असलेल्या नाटकाचा १०० वा प्रयोग सोमवारी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात झाला. यानिमित्त नाटक संपल्यानंतर कलामंदिरातच युनिटी प्रकाशनच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविकात नाटकाचे निर्माते व दिग्दर्शक नंदू माधव यांनी परंपरा तोडणारे नाटक असल्याने शंभरावा प्रयोग मुंबई व पुण्याबाहेर करण्यात आला, असे नमूद केले. ज्येष्ठ विचारवंत व समिक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी इतिहासाचा उपयोग काही घटकांकडून कसा स्वार्थासाठी केला जात आहे ते मांडले. केवळ भारतच नव्हे तर, अनेक देशांमध्ये इतिहासाचा उपयोग शस्त्रासारखा केला जात आहे. अशा परिस्थितीत रंगभूमीवर आलेल्या या नाटकात वास्तववादी इतिहास मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ हे शिवाजी राजांना कोणीतरी चिकटवलं आहे. मुळात समाजातील प्रतिकांना पळविण्याचा प्रयत्न होत असल्याचे सगळीकडेच दिसते. शिवाजी राजेही त्या प्रतिकांपैकी एक असल्याने त्यांना कसा पळविण्याचा प्रयत्न होत आहे, त्यावर हे नाटक प्रकाश टाकते. खरे तर राजांच्या सैन्यातील मावळे ही व्यवस्था बदलाची नांदी होती. परंतु शिवाजी राजांचा वापर करणाऱ्यांना ते कधी कळलेच नाहीत. या माणसांनी केवळ प्रतिकांचा व्यवहार केला. नेते  अधिक खुजे होत जातात, त्यावेळी त्यांच्याकडून समाजातील अधिक मोठी प्रतिके शोधली जातात. अशा माणसांकडून शौर्याचा खरा अर्थ युवकांना शिकविण्यातच आला नाही. क्रौर्य म्हणजे शौर्य, हेच त्यांच्याकडून बिंबविण्यात आले. या नाटकाने हे सर्व मांडण्याचा प्रयत्न केला असून अल्पावधीत शंभर प्रयोग होत असल्याने नाटकाव्दारे देण्यात येणारा संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे, असे मत प्रा. भावे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी शिवाजी हा विषय आतापर्यंत दोन समुदायांमध्ये लढाईसाठीच वापरण्यात आल्याबद्दल खंत व्यक्त केली. इतिहास कशासाठी व कसा वापरावा, हे समाजाला कळत नाही. मूलतत्ववादी वातावरणात खरे बोलता येत नसताना हे नाटक आले आहे. नाटकाच्या प्रत्येक वाक्यात व काव्यात प्रबोधन असून झूंजी टाळणारे असे हे नाटक आहे. चळवळ गोत्यात आली, असे म्हणणाऱ्यांना हे नाटक एक उत्तर आहे. त्यामुळे या नाटकाचे प्रयोग गावोगावी होण्याची आवश्यकता असल्याचे कांबळे यांनी सांगितले. नाशिकचे इतिहासप्रेमी अख्तर सय्यद यांनी शिवाजी कधीच मुस्लिमविरोधी नव्हते, असे नमूद केले. जिजाऊंनी सुफी संतांच्या गोष्टी सांगून शिवबांना घडविल्याचे इतिहास सांगतो. महाराजांकडे असलेल्या सर्वसामान्य सैनिकांना हिंदू नव्हे तर, हिंदवी स्वराज्य स्थापण्याची अपेक्षा होती. महाराजांनी मुस्लिम रयतेचे रक्षण केले. वर्तमानात महाराजांची ही भूमिका मांडण्याचे काम हे नाटक करत असल्याचे सय्यद यांनी सांगितले.  
मुस्लिम चळवळीतील कार्यकर्ते खलिल देशमुख यांनी सर्व राजकीय पक्षांसाठी बोधप्रद असणाऱ्या या नाटकाचे प्रयोग तमाशाचे फड गावोगावी होतात, त्याप्रमाणे होण्याची गरज व्यक्त केली. यावेळी लोकशाहीर संभाजी भगत, युनिटी इन्फ्रास्ट्रक्चरचे संजय भूतडा, नाटय़सेवाचे राजेंद्र जाधव, लेखक राजकुमार तांगडे आणि नाटकातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.