खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून सुरू असलेली शिवनेरी बससेवा बंद करून ती एसटी महामंडळ स्वत: चालविणार असून या माध्यमातून महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. तसेच बीओटी अर्थात ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वावर एसटीच्या बस स्थानक उभारणीला स्थगिती देण्यात आली आहे.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रावते यांच्या अध्यक्षतेखाली रिक्षा-टॅक्सी संघटना, वाहतुकदार संघटना, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासह एसटी महामंडळाची आढावा बैठक झाली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. एसटी महामंडळ सध्या भाडेतत्वावर कंत्राटदारांकडून चालकांसह बसेस घेते. या सेवेचा अभ्यास केला असता कंत्राटदाराला कोटय़वधी रुपये मिळतात तर महामंडळाला अतिशय किरकोळ रक्कम हाती पडते. यामुळे खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून चालविली जाणारी सेवा बंद करण्यात येईल. महामंडळ स्वत: अत्याधुनिक बसेस विकत घेऊन शिवनेरी व तत्सम बससेवा देणार असून जेणेकरून महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल.
याच बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. एसटी कॅन्टीन एसटी कर्मचाऱ्यांच्या महिला बचत गटांना चालविण्यास दिले जातील. जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे उत्पन्न वाढू शकेल असे त्यांनी सांगितले. प्रवासी वाहतुकीत ऑनलाईन बुकिंगद्वारे टॅक्सी सेवा पुरविण्यासाठी राज्यात नवीन नियमावली लागू केली जाणार आहे.
 यावेळी रावते यांनी कुंभमेळ्यासाठी एसटी महामंडळाने केलेल्या नियोजनाची माहिती घेतली.

महत्त्वाचे निर्णय
*बीओटी तत्त्वावरील बसस्थानकांच्या उभारणीस स्थगिती
*बसस्थानके पंचतारांकीत करणार
*प्रसाधनगृहांच्या उत्तम सुविधा निर्मितीस प्राधान्य
*एसटी बसगाडय़ांना स्वयंचलित दरवाजे बसवणार
*एसटी कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या खासगी वाहनचालकांचे परवाने रद्द करणार