राज्यात निघणारे मराठा समाजाचे मोर्चे हे राज्य सरकारसाठी हाय अलर्टचा इशारा असून मोर्चामुळे वातावरण तापले आहे. त्यात जानकर यांनी केलेल्या विधानामुळे भर पडली आहे. पडद्यामागे काही तरी शिजत असून राज्य सरकारने सावध राहावे असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
मराठा मोर्चा, महादेव जानकर यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर केलेली टीका, नाशिकमधील हिंसाचार या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर सावध राहण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात सध्या जी परिस्थिती आहे ती राजकीय षडयंत्र आहे की काय असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. राज्य अस्थिर करायचे आणि पेटवून द्यायचा विडा कोणी उचलला आहे असा सवालही सेनेने उपस्थित केला आहे. मराठा समाजाचे मोर्चे शांततेत झाले. पण त्यामागे उद्रेक आहे. कुठे तरी घटना घडते आणि एखाद्या जातीचे लोक रस्त्यावर उतरून आक्रोश करतात हे चित्र महाराष्ट्रात नित्याचेच होत आहे. बहुजन-दलित असे विराट मोर्चे काढण्याची घोषणा होऊन त्यांच्या तारखा जाहीर झाल्या. ‘एकच गर्व-बहुजन सर्व’ अशा घोषणा सुरू आहेत. भविष्यातील वादळाची ही सुरुवात आहे असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
महादेव जानकर यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेचाही शिवसेनेने समाचार घेतला आहे. राजकारण म्हटल्यावर भांड्याला भांडे लागतेच. संघटनेचा नेता म्हणून बोलणे आणि मंत्री म्हणून बोलणे यातील फरक लक्षात ठेवण्याचा सूज्ञपणा दाखवणे गरजेचे असते. पण जानकर यांची फसगत झाली असून यापुढे त्यांनी भान राखणे गरजेचे आहे असे शिवसेनेने म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले म्हणून रासपच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या फोटोवर शाईफेक करणे अयोग्य आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे. महाराष्ट्राची ही परंपरा नाही. हा सहज उद्रेक नसून पडद्यामागे काहीतरी शिजते आहे व रटरटते आहे. सरकारने सावध राहायला हवे असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.