विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना आमदार ओम राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीने घोषणा केलेल्या व बंद उद्योगांसमोर महाआरती केली. त्यानंतर राष्ट्रवादीनेही तेरणा साखर कारखान्यावर मोर्चा काढला. मोर्चा सेनेच्या विरोधात असला, तरी टीकेचा रोख मात्र काँग्रेसवर होता. पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे सेनेच्या आमदारांना पाठबळ देतात. त्यांची व सेनेची अभद्र युती आहे, असा हल्ला राणा जगजिंतसिंह पाटील यांनी चढविला.
जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्रिबदू असलेल्या ‘तेरणा’वर राष्ट्रवादीतर्फे गुरुवारी मोठा मोर्चा नेण्यात आला. ‘तेरणा’च्या मालमत्तेचे रक्षण व कारखान्यातील गरकारभाराची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी कारखान्यावर तातडीने प्रशासक नेमावा, मागील ७ वर्षांत कारखान्यातील विकलेल्या भंगाराचा तपशील द्यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा होता. मोर्चानंतर कारखाना परिसरात आयोजित सभेत पाटील यांनी खुमासदार भाषण केले.
राष्ट्रवादीला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी शिवसेना, भाजप व काँग्रेसची जिल्ह्यात अभद्र युती झाली आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या जिव्हाळय़ाची जिल्हा बँक व तेरणा कारखाना संकटाच्या खाईत लोटला जात आहे. हे विघ्न दूर करण्यासाठी मला राजकीय बळ द्या, अशी केविलवाणी साद सलग तीन दशके ‘तेरणा’ची सत्ता भोगणाऱ्या डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव माजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या वेळी घातली. तेरणा कारखान्यात मागील ७ वर्षांत विद्यमान सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार करून स्वत:ची घरे भरली. भ्रष्ट संचालकांना पालकमंत्री पाठीशी घालत आहेत. त्यांच्यामुळेच ‘तेरणा’ व जिल्हा बँक अडचणीत सापडली, असा आरोप त्यांनी केला.
सन १९७८मध्ये डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या ताब्यात हा कारखाना आल्यानंतर त्यांनी कारखान्याची गाळप क्षमता वाढविली. कारखाना कसा चालवावा, हे दाखवून दिले. २००६-०७च्या हंगामात ८ लाख ३६ हजार मेट्रिक टन विक्रमी गाळप केले. ९ लाख पोती साखर व डिस्टिलरीचे ५० ते ६० लाख असे एकूण ४०० कोटींच्या जवळपास मालमत्ता शिल्लक होती. मात्र, २००७मध्ये विरोधकांच्या ताब्यात कारखाना गेल्यानंतर गरव्यवहारांची मालिकाच सुरूझाली. आमदार ओमराजे व त्यांच्या मामांनी कारखान्याची दुरवस्था केली. आमदार कारखान्याचे कर्ज फेडल्याचा कांगावा करीत असले, तरी त्यांनी मागील ७ वर्षांतील ९०० कोटींचा हिशेब द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले. कारखान्याच्या पशातूनच मामा-भाच्याने जागजी येथे सुसज्ज बंगले थाटल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
दोन दिवसांपूर्वी आमदार ओमराजे यांनी माजी खासदार डॉ. पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांनी घोषित केलेल्या उद्योगांसमोर जागरण गोंधळ केला, तर राणाजगजितसिंह पाटील यांनी ‘तेरणा’वर मोर्चा काढून राजेिनबाळकर यांच्यासह मागील निवडणुकांत त्रासदायक ठरलेल्या काँग्रेसलाही शेलक्या शब्दांत सुनावले.