सत्ता मिळवणे हे शिवसेनेचे स्वप्न नाही आणि एकहाती सत्तेसाठी सरकार पाडण्याचा कर्मदरिद्रीपणा आम्ही केला नाही, असे स्पष्ट करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठीच राज्यात सत्तास्थापनेवेळी शिवसेनेने भाजपपुढे कमीपणा स्वीकारल्याचे ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
भाजपबरोबरचे २५ वर्षांचे नाते तुटले याबद्दल आजही खंत वाटत असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, अनाकलनीय पद्धतीने युती तुटली. तरीही शिवसेना एकाकीपणे झुंजली. एका बाजूला देशाची सत्ता, सर्व सामर्थ्य आणि साधने, राज्याराज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात उतरले. पण यासगळ्यामध्येही शिवसैनिक झुंजला. एकट्याच्या जोरावर शिवसेनेने ६३ आमदार निवडून आणले. पण एवढे सगळे करून सत्तास्थापनेसाठी भाजपला शिवसेनेची गरज लागली, याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.
राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यापूर्वी घडलेल्या घडामोडींवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, बर्‍याच वर्षांनंतर महाराष्ट्रात सत्ताबदल होत होता. नाहीतर मग पुन्हा महाराष्ट्रात कदाचित मध्यावधीची शक्यता होती. पुन्हा सगळा खर्च आणि आटापिटा करून पदरात काय पडणार, या सगळ्याचा विचार करून नवीन चेहरे येत असतील, तर त्यांच्यासोबत राहूया असे वाटल्यानेच भाजपला पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राला चांगले दिवस यावेत, यासाठीच आपण हे केल्याचे त्यांनी सांगितले.