युती तोडल्याचे श्रेय घेणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शिवसेनेने शुक्रवारी खडे बोल सुनावले असून, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, तर तुमच्या पाठीत वार झालेच नसते. कारण पाठीत वार करण्याची शिवसेनेची पद्धत नाही, असे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये लिहिण्यात आले आहे. आपल्याकडील गुपिते जाहीर केल्यास देश हादरेल, असे खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे पुढील काळात एखादे छोटे महाभारत घडले तरी आश्चर्य वाटायला नको, असेही सूचक विधान शिवसेनेने केले आहे.
शिवसेनेने म्हटले आहे की, युती आपणच तोडल्याची शेखी ते एखाद्या शौर्यचक्राप्रमाणे मिरवीत होते. शिवसेनेशी युती तोडली म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला, पण माझ्या वाट्याला हे काय आले? असा प्रश्‍न खडसे यांनी केला. खडसे यांची वेदना समजून घेतली पाहिजे. खडसे यांनी शिवसेनेशी युती तोडण्यात पुढचे पाऊल टाकले. कारण त्यावेळी देशात मोदी यांची लाट होती व त्या लाटेत ओंडके व काटक्याही तरंगल्या. आम्हाला त्याची खंत नाही. पण युती तोडली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, असे खडसे म्हणतात. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार कदाचित झाले नसते. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर आभाळ कोसळले असते काय? याचे चिंतन करण्यास खडसे आता मोकळे आहेत, असा टोला लगावण्यात आला आहे.