होय, शहरातील रस्त्यांची स्थिती शिवसेनेला महापालिकेच्या निवडणुकीत अडचण ठरू शकते, असे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी मान्य केले. निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या रणनीतीबाबत ‘लोकसत्ता’शी ते बोलत होते. बरीच कामे सुरू आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा रास्त आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी राज्यसभेतील खासदार व काही आमदारांचा निधी रस्त्यांसाठी मागू. त्यातून रस्ते अधिक सुधारू, असे ते म्हणाले. महापौर कला ओझा यांनीही या कामी अधिक सक्रिय राहण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला त्यांनी दिला.
शिवसेनेने विविध प्रभागांत निवडणुकांसाठी बैठकांचे सत्र सुरू केले. महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जैस्वाल यांनी महापालिकेत लक्ष घालण्यास सुरुवात केली. महापालिकेत खासदार चंद्रकांत खैरे यांचा शब्द अंतिम मानला जात असे. मात्र, जैस्वाल यांच्या नियुक्तीनंतर निवडणुकीची सूत्रे त्यांच्यामार्फत हलविली जातील, असे सेनेतील पदाधिकारी सांगतात. या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या रणनीतीच्या अनुषंगाने जैस्वाल यांनी तयारी सुरू केली. रस्त्यांच्या प्रश्नावर निधीसाठी खासदारांकडे साकडे घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. या साठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही खासदारांना सूचना द्याव्यात, असे त्यांनी म्हटले.
खासदार खैरे व राजकुमार धूत यांच्या निधीतून प्रत्येकी ५ कोटींची कामे घ्यावीत, अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. हे पद मिळाल्यामुळे काही जुने शिवसैनिक पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे संघटना अधिक मजबूत झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
वाढीव एफएसआयची मागणी
जुन्या शहरात दीड एफएसआय मंजूर व्हावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगत महापालिकेच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्दय़ांबरोबर आक्रमक हिंदुत्व हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे असतील, असे जैस्वाल म्हणाले. शहर वाढलेले असल्याने ११३ प्रभाग होतील व वाढीव प्रभागांतील जागावाटपासाठी नव्याने भाजपबरोबर बोलणी केली जाईल, असेही ते म्हणाले. महापालिका डबघाईला आली, हे सगळ्यांनाच माहीत आहे. आयुक्तही नवे आले आहेत. अधिकारीही नवेच आहेत. त्यामुळे कामाला म्हणावी तशी गती येत नाही. काही व्यापाऱ्यांना करवसुलीच्या वेळी जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे का, हेदेखील तपासू. मात्र, जे कर भरत नाहीत, अशा व्यापाऱ्यांना महापालिकेने दंडही आकारायला हवा. या सर्व कामांत महापौरांना अधिक सक्रिय व्हायला हे खरे. त्यांच्या कामाविषयी नाराजी आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. या विषयी विचारले असता जैस्वाल म्हणाले की, कोणालाही १०० टक्के समाधानी करता येत नसते. मात्र, पाण्याचा प्रश्न व भूमिगत गटार योजना याकडे आम्ही सर्व जण लक्ष ठेवून आहोत. ही कामे तातडीने व्हावीत, असेच आम्हाला वाटते.
‘पंख छाटले हे खोटे’
महानगरप्रमुखपदी प्रदीप जैस्वाल यांची नियुक्ती म्हणजे खासदार चंद्रकांत खैरे यांचे पंख कापण्याचा प्रकार असल्याची राजकीय चर्चा चुकीची असल्याचे जैस्वाल म्हणाले. आम्ही अनेक वर्षांपासून एकत्रित काम करीत आहोत. त्यामुळे असे म्हणणे चूक ठरेल. आम्ही सर्व जण मिळून काम करू, असे सांगत त्यांनी महापालिकेच्या आर्थिक डबघाईस लोकप्रतिनिधी नव्हे, तर प्रशासनच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.