भारतातील मुस्लिम हे आपलेच असल्याचे सांगत त्यांना बळ देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोझीकोड येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत केले होते. पंतप्रधान मोदींनी अचानक घेतलेल्या भुमिकेबद्दल शिवसेनेने आश्चर्य व्यक्त करत येत्या काही महिन्यात उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतांवर डोळा ठेऊन तर असं काही होत नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली आहे. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांनी मुस्लिम समाजाबाबत घेतलेल्या भुमिकेवर आपले मत व्यक्त केले आहे. मुसलमानांना आपलेसे करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज असली तरी त्यांना देशातील कायद्याची व संस्कृतीची जाणीव करून देण्याची जबाबदारीही पंतप्रधांनानी स्वीकारावी असा खोचक सल्लाही दिला आहे.

मराठा समाजाच्या विराट मोर्चांची प्रेरणा घेऊन मुसलमान समाजानेही त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चे काढण्याचे ठरवले आहे. मुसलमानांच्या खांद्यावर असे विश्‍वासाने डोके ठेवले जात असतानाच ‘आता आम्हीही मोर्चे काढणार. वातावरण तापवणार’ अशी घोषणा मुस्लिम संघटनांच्या नेत्यांनी करावी याचे आश्‍चर्य वाटते असे म्हणत मुसलमानांनी मोर्चे काढावेत व आपल्या मागण्यांसाठी हैदोस घालावा हे नवीन नसल्याचे म्हटले. पण पंतप्रधान मोदी यांनी कोझीकोड येथे केलेल्या भाषणात मुस्लिमांना आपलेसे करण्याचा संदेश देताच मुसलमानांनी हिरव्या लुंग्या सावरून मोर्चाची तयारी करावी हा काय निव्वळ योगायोग समजावा? असा सवालही उपस्थित केला आहे.
‘मुसलमान जेव्हा समान नागरी कायद्याची राष्ट्रीय भूमिका स्वीकारतील त्या दिवशी मुसलमान खरोखरच मन से आपले होतील असे मत व्यक्त करत मुसलमान समाज अंधारात व अज्ञानात आहे तो त्यांच्यातील धार्मिक रूढींमुळे. मुसलमानांना आपलेसे करायला कोणाचीच हरकत नाही. त्यांनी फक्त ही मातृभूमी आपलीशी करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘वंदे मातरम्’ला विरोध करणे सोडले पाहिजे. जो ‘वंदे मातरम्’चा गजर करील तो मुसलमान आपलाच आहे. कश्मीरमधील जे मुसलमान ‘पाक झिंदाबाद’च्या घोषणा देत आहेत, इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकावीत आहेत, बुरहान वाणीसाठी शोक करत आहेत अशा मुसलमानांनाही छातीशी कवटाळून आपले म्हणायचे काय? यावरही पंतप्रधानांनी मंथन करण्याचा सल्ला दिला आहे. या वेळी शिवसेनेने समाजवादी पक्षावरही कोरडे ओढले. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात इस्लामी राजवट यादवांनी सुरू केली आहे ती उलथवून तेथे प्रखर हिंदुत्ववादी राज्य यायला पाहिजे असे म्हटले आहे. मुसलमानांना गाठीशी बांधून राजकारण करणार्‍यांची एक नवी ‘पेढी’ निर्माण झाली व त्यात राममंदिराचा कळस उतरला हेच आता दिसते. मुसलमान हा देशाचा सदासर्वदा दुश्मन नाही, पण हिंदूंना त्यांच्यामुळे त्यांच्याच हिंदुस्थानात मान-अधिकार मिळत नाही व सरकारे बदलली तरी मुसलमानी लांगूलचालनाचे नवे प्रयोग घडतच असल्याचा टोलाही लगावला आहे.