शिवसेना हा राज्यात रुजलेला पक्ष असून पुढील काळात विधायक मुद्दे घेऊन आंदोलने केल्यास आणि त्याला रचनात्मक कार्याची जोड दिल्यास या पक्षाची डरकाळी कायम राहील. गेल्या पाच-सात वर्षांत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली या पक्षाची वाटचाल सुरू असून पुढील काळातही त्याला चांगली उभारी मिळेल, असा आशावाद सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.
सुयोग येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना शिवसेनेच्या भविष्यकालीन वाटचालीबाबत भुजबळ यांनी हा आशावाद व्यक्त केला. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे काय होणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्याबाबत आपली भूमिका विशद करताना भुजबळ म्हणाले, मुळातच ही संघटना गाव-पाडय़ापर्यंत पोहोचली आहे. शिवसेना हा राज्यात रुजलेला पक्ष असून चांगले प्रश्न घेऊन आंदोलने केल्यास आणि त्याला रचनात्मक कार्याची जोड दिल्यास या पक्षाचे केवळ अस्तित्वच राहील असे नाही तर त्याला पुन्हा उभारी मिळू शकेल. कोणताही करिश्मा नसतानाही उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव यांची सत्ता येऊ शकते, मायावतींचे सरकार येऊ शकते असे सांगत त्यांनी शिवसेनेलाही भविष्यात सत्तेचा सोपान गाठता येईल असे सूचित केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही विश्वास व्यक्त करताना गेली पाच-सात वर्षे तेच पक्ष चालवीत असल्याचेही भुजबळ यांनी निदर्शनास आणले.
 राज्यात टोलवसुलीवरून लोकांच्यात मोठय़ा प्रमाणात असंतोष असल्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता, टोलचा त्रास सामान्य लोकांना होत नाही, तर गाडीवाल्यांना होतो. खासदार आमदारांकडून आजही मोठय़ा प्रमाणात बीओटीतून रस्त्यांचे रुंदीकरण करण्याच्या मागण्या येत आहेत. केंद्र सरकारच्या नियमानुसारच राज्याचे टोल धोरण असून पूर्वी दिलेल्या टोल नाक्यांच्या ठेक्यात आता बदल करता येणार नाहीत. मात्र नवीन कामांच्या निविदा काढताना काही बदल करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढे दोन टोलनाक्यांमधील अंतर वाढविण्यात आले असून ज्या रस्त्यावर टोल सुरू करायचा आहे त्याच्या निविदा काढण्यापूर्वी त्या रस्त्यावरील वाहनांची शास्त्रशुद्ध मोजणी केली जाईल, तसेच ज्या प्रकल्पात ठेकेदाराला नफा होईल त्यातील ७५ टक्के नफा शासनास आणि २५ टक्के ठेकेदारास मिळेल अशी अटही घालण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.