बलुचिस्तानातील स्वातंत्र्यसैनिकांच्या किंकाळ्या लाल किल्ल्यावर ऐकू येतात, पण बेळगावमध्ये ६० वर्षांपासून सुरू असलेला आक्रोश ऐकू जात नसेल तर न्याय व अन्यायाच्या फालतू गोष्टी कोणी करू नयेत असे सांगत शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अण्णा हजारेंनी बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर होणा-या अत्याचाराविरोधात कधी उपोषण का केले नाही असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.

बेळगावमध्ये काळादिन आंदोलनात सहभागी झालेल्या मराठी भाषिक तरुणांवर कर्नाटकमधील पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे. काश्मीर खो-यात मारला गेलेला दहशतवादी बुरहान वानीसाठी ऊरबुडवे राजकीय पक्ष मानवी हक्कांचे तुणतुणे वाजू शकतात, अगदी तुरुंगातून पळालेल्या आणि चकमकीत खात्मा झालेल्या आठ दहशतवाद्यांचाही सर्व राजकीय पक्षांना पुळका येतो. पण सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी हे सर्व ऊरबडवे पुढे का येत नाहीत असा सवालच शिवसेनेने उपस्थित केला आहे.कावेरी प्रश्नावरुन रण पेटले तेव्हा तामिळनाडूतील कानडी वस्त्यांवर हल्ले झाले होते. मनगटे आणि अस्मिता सर्वांनाच असतात.  काळे फेकण्याची आणि हल्ले करण्याची क्षमता महाराष्ट्राच्या मनगटात आहे हे कानडी मंडळीनी लक्षात घ्यावे असा इशाराच शिवसेनेने कर्नाटक सरकारला दिला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही कोणाच्याही रागलोभाची पर्वा न करता सीमा भागातील मराठी माणसाच्या पाठिशी उभे राहावे अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.

 

मुंबईसह राज्यभरात कानडी जनता राहत असून त्यांचा व्यवसायही चांगला सुरु आहे. पण बेळगावमधील घटनांनी त्यांच्यातही चिंतेचे वातावरण आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून विदर्भवाद्यांनी उचल खाल्ली. पण या विदर्भवाद्यांनी पोलिसांनी सोलून काढले नाही. या दोन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून द्यावात असे अग्रलेखात म्हटले आहे