महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेनेची स्पर्धा आघाडीशी नव्हे तर भाजपशी सुरु असल्याचे सांगत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.

औरंगाबादमध्ये निवडणूक तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. या टीकेमुळे भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष पुन्हा एकदा दिसून आला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन भाजपने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेनेही यावरुन भाजपवर पलटवार केला आहे. पारदर्शक व्यवहार फक्त मुंबई महापालिकेतच नव्हे तर राज्य आणि सरकारमध्ये असायला हवे असे शिवसेनेने म्हटले आहे. नोटाबंदीचा निर्णय़ हा एकतर्फीच होता. तो निर्णयदेखील पारदर्शकपणे झाला असता तर एवढा गदारोळ झाला नसता असा टोला शिवसेना आमदार अनिल परब यांनी लगावला. किरीट सोमय्या यांची भूमिका भाजपची अधिकृत भूमिका असल्याचे जेव्हा सांगितले जाईल त्यावेळी सोमय्या यांच्या विधानांना आम्ही गांभीर्याने घेऊ असे परब यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे महापालिकेतील युतीबाबत भाजप आणि शिवसेना नेत्यांची आज (मंगळवारी) बैठक पार पडली. तर मुंबई महापालिकेसंदर्भात होणारी युतीची बैठक होऊ शकलेली नाही. ही बैठक उद्या (बुधवारी) होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

नाशिकमध्येही युतीमध्ये फाटाफूट झाली आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर युती होणार की नाही या प्रश्नाला आता सुरुंग लागले आहेत. आज नाशिकमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना पक्षाचे आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करत युती होणार की नाही या विषयाला ब्रेक लागला आहे.