रत्नागिरी जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या पूर्वसंध्येला चिपळूण शहरामधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पालकमंत्री ना. रवींद्र वायकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या शोभायात्रेला सुरुवात झाली. चिपळूणचे ग्रामदैवत श्री कालभैरव सांस्कृतिक मंच व प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेला चिपळूणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शुक्रवारी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला प्रशासन व श्री कालभैरव सांस्कृतिक मंचच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री ना. रवींद्र वायकर, महोत्सवाचे अध्यक्ष आ. सदानंद चव्हाण, तालुक्यातील व शहरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यात सहभागी झाल्या. श्री कालभैरव सांस्कृतिक मंचचे विविध सामाजिक विषयांवरील सात चित्ररथ सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे कोकण सिरत कमिटीचा खालू बाजा व रातीब, शिरगाव हायस्कूल, बांदल हायस्कूल, पेढे विद्यालय, दलवाई हायस्कूल, युनायटेड हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, परशुराम हायस्कूल या शाळांची लेझीम व झांज पथके सहभागी झाली होती. पाग महिला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फॅन्सी ड्रेस केले. नाशिक ढोल पथके, शंकरवाडी मंडळ, गोवळकोट येथील करंजेश्वरी मंडळाचा पालखी उत्सव सोहळा सादर केला. चिंचनाका येथे नागरिकांनी व नगर परिषदेच्या वतीने फुलांचा वर्षांव शोभायात्रेवर करण्यात आला. प्लॅस्टिक हटाव – पर्यावरण बचाव मोहिमेसाठी कापडी पिशव्यांचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी आमदार व महोत्सवाचे अध्यक्ष सदानंद चव्हाण, जि. प. अध्यक्ष बुवा गोलमडे, नगराध्यक्षा सावित्रीताई होमकळस, सभापती स्नेहा मेस्त्री, जिल्हाधिकारी पी. प्रदीप, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण शर्मा, प्रांताधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील, सीमाताई चव्हाण यांच्यासह चिपळूण तालुका व शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. चिपळूणकरांचा उत्साह पाहून पालकमंत्रीही उत्साही दिसत होते.

रत्नागिरी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ व सहआयोजक ग्लोबल चिपळूण टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने आज ७ मेपासून चिपळूण येथे रत्नागिरी पर्यटन महोत्सवाला सुरुवात होत आहे. हा महोत्सव ९ मेपर्यंत पवन तलाव मैदानावर चालणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. इको टुरिझम टूर, क्रोकोडाइल सफारी, आमराई टूर, वॉटर स्पोर्ट्स या महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी २० मान्यवरांचा रत्नागिरी भूषण पुरस्कार देऊन सत्कार केला जाणार आहे. चिपळूण-संगमेश्वरचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री ना. अनंत गीते यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी परिवहनमंत्री ना. दिवाकर रावते, पालकमंत्री ना. रवींद्र वायकर, जि.प. अध्यक्ष बुवा गोलमडे यांच्यासह खासदार व आमदारांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

पर्यटन महोत्सवाच्या जागृतीसाठी डीबीजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरात ठिकठिकाणी पथनाटय़े सादर केली.