नागपुरात २४ वर्षीय शुभम केचे या रेडिओ जॉकीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ‘रेडिओ मिरची ९८.३’ या एफएम वाहिनीचा तो आरजे होता. गेल्या एक महिन्यापासून तो आजारी होता. पण तब्येतीत सुधारणा झाल्यावर तो कामावर रुजू झाला होता. आज लाइव्ह शोच्या ब्रेक दरम्यान शौचालयात गेला असताना त्याची शुद्ध हरपली.
सकाळी ७ ते ११ दरम्यान त्याचा ‘हाय नागपूर’ हा शो असायचा. रोजच्या प्रमाणे आजही त्याचा हा शो सुरु होता. मात्र सकाळी ९.३० च्या सुमारास, ब्रेकमध्ये तो शौचालयात गेला. मात्र ब्रेक उलटून गेला तरी शुभम परतला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरु झाली. सहकाऱ्यांनी शोधाशोध केल्यावर तो बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तरुण रेडिओ जॉकी शुभमच्या मृत्यूने नागपूरमध्ये शोकाकूल वातावरण आहे.