अकोट तालुक्यातील अंबोडा येथील चिमुकल्या शुभम शिवरकर हत्याकांडास अखेर वाचा फुटली असून त्याचे मारेकरी त्याचे शेजारीच निघाले आहेत. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. शंकर सुरेश कोमटी (२५), रमेश मनोज अंभोरे (२८) व संतोष उर्फ पापा अण्णा कोमटी (२४) अशी या मारेकऱ्यांची नावे आहेत. मंगळवारी उशिरा रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.
शुभम हत्याकांड झाल्यावर पहिल्या दिवसापासून पोलिसांची नजर महेश शिवरकर यांच्या शेजारी राहणाऱ्या शंकरवर होती व अखेर पोलिसांचाच संशय खरा ठरला. दरम्यान, शुभमच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू असतानाच दोनच दिवसापूर्वी शुभंमचे वडील महेश शिवरकर यांनी आपल्या गावातील आपल्या समाजाच्या लोकांची बैठक घेतली व आज शुभमचा बळी गेला. उद्या तुमचेही कु णी जाईल तेव्हा कोणाला काही माहिती असल्यास सांगा, असे त्यांनी आवाहन करताच या बठकीत काही लोकांनी शंकर कोमटी, रमेश अंभोरे व संतोष कोमटी यांना त्या विहिरीजवळून येताना पाहिल्याचे सांगितले. ही माहिती शुभमच्या वडिलांनी पोलिसांना कळविली. अकोट ग्रामीणचे ठाणेदार किशोर शेळके यांनी या तिघांनाही अटक केली. पोलिसांनी त्यांना पकडल्यावर पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी केलेले दुष्कृत्य पूर्णत: कथन केले.
त्यातून भयंकर बाब उघड झाली. शुभंमच्या वडिलांकडून खंडणी वसुलीचा त्यांचा डाव होता. या प्रकरणातील तिन्ही आरोपी काहीच कामधंदा न करणारे व आईवडिलांच्या, तसेच आपल्या बायकांच्या जीवावर चैन करणारे आहेत. शुभमचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून तीन लाखांची खंडणी वसूल करण्याचा त्यांचा बेत होता. यासाठी शुभमच्या अगदी शेजारी राहणाऱ्या शंकर कोमटीने शुभंमवर पाळत ठेवली होती. ज्या दिवशी शुभमचे अपहरण झाले त्याच दिवशी नेमका तो शाळेत गेला नाही. घराबाहेर खेळत होता. ही संधी पाहून शंकर याने रमेशला इशारा केला व दोघांनी शुभमचे तोंड दाबून त्याला पळवून जवळच्या मक्याच्या शेतात नेले. दरम्यान, आरोपी शंकर हा शुभमच्या वडिलांना धमकी देण्यासाठी नवे सीमकार्ड विकत आणण्यासाठी अकोटला गेला तेथे त्याची पत्नी भेटली. ती केस गोळा करण्याचा व विकण्याचा व्यवसाय करते. त्यानंतर केस विकून ते दोघेही गावी परत आल्याने त्याला सीमकार्ड विकत घेता आले नाही. गावात आल्यावर शुभमच्या शोधासाठी सारे गाव व पोलीस लागले आहेत, हे पाहून सर्वच आरोपी घाबरले व त्यांनी शेवटी शुभमचे नाकतोंड दाबले परिणामी, शुभम बेशुद्ध झाला. संतोष याने आपल्या घरून सोयाबीनचे पोते आणले व त्यात शुभमला टाकले व ते पोते विहिरीतील पाण्यात सोडून दिले. त्यात शुभमचा मृत्यू झाला.