जालना-खामगाव आणि सोलापूर-जालना-जळगाव या दोन नवीन रेल्वेमार्गाच्या निर्मितीकडे राज्य, तसेच केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने जालना, अंबड, राजूर आदी ठिकाणी सह्य़ांची मोहीम घेण्यात आली. या निमित्ताने रेल्वेविषयक अन्य मागण्याही करण्यात आल्या. जिल्हा रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी व अन्य पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले.
समितीचे पदाधिकारी अॅड. डी. एस. कुलकर्णी म्हणाले की, जालना-खामगाव-शेगाव या १६५ किलोमीटर रेल्वेमार्गाची मागणी जुनीच आहे. स्वातंत्र्यापूर्वीच या मार्गास मान्यता मिळून कामही सुरू झाले होते. १९३३ मध्ये प्रत्यक्ष कामास प्रारंभ होऊन नंतर ते थांबले. या मार्गाचे तांत्रिक सर्वेक्षण २०१०-११ मध्ये पुन्हा झाले. त्यावेळी त्याचा अंदाजित खर्च १ हजार २६ कोटी दाखविण्यात आला. पैकी निम्मा खर्च राज्य सरकारने उचलणे अपेक्षित आहे. कारण रेल्वे बोर्डाने नियोजित पुणे-नाशिक नवीन रेल्वेमार्गाच्या खर्चापैकी निम्मा वाटा उचलण्यास मान्यता दिली आहे. याच धर्तीवर या मार्गाचाही विचार होणे क्रमप्राप्त ठरले आहे. गेल्या ४ वर्षांत या मार्गासाठी लागणारा खर्च वाढल्याची शक्यता आहे. विलंब होत असल्याने या नियोजित मार्गाच्या खर्चात वाढ होत आहे. १९९४ मधील सर्वेक्षणानुसार हा खर्च ३६८ कोटी होता. या मार्गासाठी जिल्हा रेल्वे संघर्ष समिती, तसेच बुलडाणा जिल्हा रेल्वे लोकआंदोलन समितीने वेळोवेळी आंदोलने केली.
त्याचप्रमाणे सोलापूर-जालना-जळगाव या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले असले, तरी काम सुरू मात्र केले जात नाही. जिल्हा रेल्वे संघर्ष समितीने या मार्गासंदर्भातही वेळोवेळी आग्रह धरला. त्याची उपयुक्तता स्पष्ट केली. अन्य काही मागण्याही आहेत. मुंबई, सिकंदराबादला जाणाऱ्या एक्स्प्रेस गाडय़ांना जालना स्थानकासाठी स्वतंत्र डवे असावेत. या दोन्ही ठिकाणी जालना स्थानकातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादऐवजी जालना स्थानकातून सोडण्याचे रेल्वे बोर्डाने मान्य केले असले, तरी त्यासही विलंब होत आहे. मनमाड-जालनामार्गे पुढे जाणाऱ्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यात यावे, नांदेड-मनमाड-वाराणशी-गोरखपूर अशी नियमित गाडी सुरू करावी, नांदेड-पुणे एक्स्प्रेस दररोज सोडावी, जालना रेल्वे स्थानकाजवळून विद्युत कॉलनीकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर भुयारी मार्ग तयार करावा; देवगिरी तसेच नंदीग्राम व एक्स्प्रेस गाडय़ांची जालना स्थानकावर थांबण्याची वेळ वाढवावी आदी मागण्या जिल्हा रेल्वे संघर्ष समितीने केल्या आहेत.
अॅड. कुळकर्णी म्हणाले की, जालना रेल्वेस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम २००७ मध्ये सुरू झाले आणि सध्याही त्यातील अन्य कामे चालू असलेली दिसतात. जालना स्थानकातून जनशताब्दी एक्स्प्रेस सोडण्याची साधी मागणीही मागील ५-६ वर्षांत पूर्ण झाली नाही. फेब्रुवारी २०१० मध्ये मराठवाडय़ातील खासदारांची बैठक दक्षिण मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या उपस्थितीत नांदेड येथे झाली. त्यावेळी या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवून जनशताब्दी एक्स्प्रेस जालना स्थानकातून सोडण्याबाबत आश्वासन देण्यात आले. आता येत्या १५ दिवसांचे आश्वासन मिळाले आहे.