वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलु यांच्या तोंडावर शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ विद्यापीठ कर्मचारी संघाच्या वतीने शनिवारी येथे मूकमोर्चा काढण्यात आला. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी कुलगुरूंच्या दालनात जाऊन त्यांच्या तोंडावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला होता.
शेंद्रा व सायळा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलु यांना शुक्रवारी काळे फासण्याचा प्रयत्न केला. नवा मोंढा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून किशोर ढगे, गणेश ढगे, बाबासाहेब खटींग, सखाराम िशदे, कैलास पौळ आदी २४ जणांना अटक केली. विद्यापीठ कर्मचारी संघ, आजी-माजी विद्यार्थी संघटना, कॉस्ट्राईब कर्मचारी संघटना आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. मोर्चात विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हल्लेखोर प्रकल्पग्रस्तांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांना धमक्या देणे, शासकीय कार्यक्रमात अडथळा निर्माण करणे, विद्यापीठ मालमत्तेचे नुकसान करणे या प्रकारांमुळे विद्यापीठात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा विद्यापीठातील शिक्षण व संशोधनावर परिणाम होत असल्याचा आरोप कर्मचारी संघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला. कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिलीप मोरे, सरचिटणीस पी. टी. पवार, उपाध्यक्ष प्रदीप कदम, जी. डी. िशदे, कृष्णा जावळे, डॉ. जी. के. लोंढे, अनिल गाडे यांच्यासह विद्यापीठ अधिष्ठाता डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. बी. बी. भोसले आदींसह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख मोर्चात सहभागी झाले होते.
मराठवाडा कृषी विद्यापीठासाठी सरकारने १९७२ मध्ये शेंद्रा, सायळा, बलसा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यात आले. विद्यापीठाने काही जमीन अतिरिक्त ठरविली. ही जमीन शेतकऱ्यांना परत करावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. गेल्या १५ वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी विद्यापीठाच्या काही जमिनीवर वहिती करतात. यावर्षीही या जमिनीवर खरिपाची पेरणी केली. परंतु विद्यापीठाने पोलीस बंदोबस्तात हे पीक नष्ट केले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी संतापले. त्यातून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी कुलगुरूंच्या दालनात हल्लाबोल केला. या वेळी प्रकल्पग्रस्त व कुलगुरू यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली व किशोर ढगे यांनी कुलगुरूंना काळे फासण्याचा प्रयत्न केला.