चांदा ते बांदा या राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मत्स्य, कृषी आणि पर्यटन या त्रिसूत्री विकास कार्यक्रमावर आधारित सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास करण्याचे नियोजन आहे.  त्यामुळे आगामी वर्ष हे सिंधुदुर्ग जिल्हा विकासाचे वर्ष ठरेल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.  महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिन ध्वजारोहणाच्या सभारंभप्रसंगी ते बोलत होते.

पोलीस परेड ग्राउंड, सिंधुदुर्ग नगरी येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभप्रसंगी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर,  जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय िशदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, अतिरिक्त  उपमुख्यकार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, अतिरिक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाची कामगिरी लाक्षणिक आहे. उद्योग, व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टीने राज्य  शासनाने क्रांतिकारक निर्णय घेतलेले आहेत.  गेल्या दीड वषार्ंत राज्यात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूकदार यावेत याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत.  या प्रयत्नांची फलश्रुती म्हणूनच राज्याला मेक इन इंडियाच्या शुभारंभाचा मान मिळाला. राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्हय़ात विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात विकासकामांनी गती घेतली असून महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. सीवर्ल्ड प्रकल्पांतर्गत क्षेत्र निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग – कोल्हापूर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या विकासासाठी हे महत्त्वाचे  पाऊल ठरले आहे.

भविष्यकाळात लवकरच चिपी विमानतळ कार्यरत होईल अशी आशा आहे. असे स्पष्ट  करून ते म्हणाले की,  जिल्ह्य़ात कोको, पेरू, दर्जेदार टोमॅटो, सुधारित जातीची भात लागवड प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी झाली आहे.  त्यामुळे कृषी विकासाला चालना मिळाली आहे.  तसेच कोकण ग्राम पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण पर्यटनाला जिल्ह्य़ात चालना दिली जात असून त्यामुळे स्थानिक ग्रामीण जनतेला रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातच नव्हेत तर देशात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाने आघाडी घ्यावी म्हणून कृषी, मत्स्य, पर्यटन, वन, पर्यावरण यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचा विकास व्हावा यासाठी सर्व पातळ्यांवर हे वर्ष विकासाचे वर्ष म्हणून ध्यास घ्यायला पाहिजे असे आवाहनही या वेळी बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

महाराष्ट्र वर्धापन दिनाचे औचित्य साधून या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारीमुक्त केल्याबद्दल जिल्हा परिषद अधिकारी संग्राम प्रभुगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांचा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  तसेच या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात माकडताप आजाराच्या साथीमध्ये प्रतिबंधांत्मक उपाययोजनेसाठी उत्कृ ष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दलचे दिले जाणारे सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्य़ात निवड झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी युवा आदर्श तलाठी पुरस्कारावर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा युवा पुरस्कार तसेच स्काउट्स आणि गाइड राज्य पुरस्कार, प्राथमिक शिक्षणाचा गुणवत्ता विकास पुरस्कार आदी पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.  पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियान प्रचार, प्रसिद्धी व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.  जिल्ह्य़ात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत निवड झालेल्या २३ गावांत ही व्हॅन १ मे ते ३१ मे या कालावधीत अभियानाचा प्रसार व प्रसिद्धी करणार आहे.

डॉ. तुषार चिपळूणकर, डॉ. प्रशांत सवदी, डॉ. विद्यानंद देसाई, वनरक्षक दोडामार्ग अतुल पाटील, पोलीस हवालदार अशोक तानावडे, पोलीस नाईक मििलद परुळेकर, आदर्श तलाठी  संगीता दाभोळकर, जिल्हा युवक पुरस्कार विजेते मंडळ श्री देव हेळेकर युवक मंडळ कारीवडे ता. सावंतवाडी यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य स्काउट गाइड पुरस्कार विजेत्या शाळा वराडकर हायस्कूल, कट्टा विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, डॉन बास्को ओरोस या शाळांचा तर प्राथमिक शिक्षक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जि. प. प्राथमिक शाळा मसुरे जि. प. पूर्वप्राथमिक शाळा हळवल गुरववाडी तर उत्तेजनार्थ जि. प. पूर्व प्राथमिक शाळा खारेपाटण इळये ता. देवगड व शिरवंडे ता. मालवण या शाळांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी दंगल नियंत्रक पथक, पोलीस पुरुष पथक, पोलीस महिला पथक, होमगार्ड पुरुष पथक, होमगार्ड महिला पथक, वज्रवाहन पथक, श्वान पथक, जलद प्रतिसाद पथक आदी पथकांनी मदानावर संचलन केले. या वेळी ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.