सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक मंडळ निवडणुकीत नारायण राणे यांच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत संकल्प सिद्धी पॅनेलने आपले वर्चस्व सिद्ध करताना युतीचा १५ विरुद्ध ४ असा एकतर्फी धुव्वा उडवला. या निकालांमुळे सिंधुदुर्गात राणे यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. संकल्प सिद्धी पॅनेलला १५ जागांवर विजय मिळाला. तर त्यांच्या विरोधात असलेल्या युतीच्या सहकार वैभव पॅनेलला अवघ्या चारच जागांवर विजय मिळवता आला. विशेष म्हणजे सहकार वैभव पॅनेलचे प्रमुख राजन तेली यांनाच या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. संकल्प सिद्धी पॅनेलचे प्रमोद धुरी यांनी त्यांना पराभूत केली. धुरी हे नारायण राणे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सिंधुदुर्गातील कॉंग्रेसच्या गुंडगिरीमुळे आणि झुंडशाहीमुळे आपला पराभव झाला, अशी प्रतिक्रिया राजन तेली यांनी पराभवानंतर दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या एकूण १९ जागांपैकी एक जागेवर संकल्प सिद्धी पॅनेलच्या सतीश सावंत यांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित जागांवरील निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या या पॅनेलने युतीच्या पॅनेलला धोबीपछाड दिला आहे.
या निवडणुकीत मालवणमधून संकल्प सिद्धी पॅनेलचे व्हिक्टर डॉन्टस, वेंगुर्लेतून मनिष दळवी, कुडाळमधून प्रकाश मोरे विजयी झाले. सावंतवाडीतून सहकार वैभव पॅनेलचे प्रकाश परब विजयी झाले.