सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिल्या शाहीस्नानाचा सोहळा शनिवारी तुरळक घटनांचा अपवाद वगळता व्यवस्थितपणे पार पडला. कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणी शाहीस्नानाला शनिवारी पहाटेपासून गोदावरीच्या तीरावर सुरुवात झाली. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी जुना, अग्नी आणि आवाहन आखाड्याचे साधू-महंतांनी प्रथम शाहीस्नान केले. महंत ग्यानदास यांनी रामकुंडात पहिली डुबकी लगावली. दरम्यान, शाहीस्नानाच्या सोहळ्याला एका भाविकाच्या मृत्यूमुळे  गालबोट लागले.  त्र्यंबक घाटावरील या घटनेत मुंबईतील एका वृद्ध भाविकाचा शाहीस्नान करून परतीचा प्रवास करत असताना मृत्यू झाला.
दरम्यान, आजचा दिवस विविध आखाड्यांतील वादामुळेही चांगलाच गाजला.  दिगंबर आखाड्याला स्नानास प्रतिक्षा करावी लागल्यानी वादाला तोंड फुटले. पण, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण शांत झाले आहे. तर, दसक येथील रामघाटावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. रामकुंडाकडे जाण्यासाठी भाविकांनी बेरिकेड्स तोडून रामकुंडावर जाण्याचा प्रयत्न केला.

* कुंभ मेळ्यात रामकुंडा वरील भाविकांच्या गर्दीत वाढ; संध्याकाळपर्यंत भाविकांच्या  संख्येत वाढ होण्याची शक्यता
* शाहीस्नानासाठी रामकुंडावर बुडालेल्या भाविकाला वाचविण्यात यश
* दसक येथील रामघाटावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. रामकुंडाकडे जाण्यासाठी भाविकांनी बेरिकेड्स तोडून रामकुंडावर जाण्याचा प्रयत्न केला.
* त्र्यंबकमध्ये परतीच्या प्रवासात मुंबईतील वृद्धाचा मृत्यू.
*  त्र्यंबकेश्वरमध्ये दहादी आखाड्यांचे शाही स्नान पूर्ण.
* भविकांची अडवणूक करून राजकारण्यांचे स्नान, तिसर्‍या आखाड्यापूर्वीच राज्यमंत्री दादा भूसे व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आटोपले स्नान.
* प्रशासनाचा आणि पोलिसांचा अतिरेक आमची चूक झाली, पालकमंत्र्यांची कबुली
* वेळ वाचवण्यासाठी खास शॉवर स्नानाची व्यवस्था.
* कुंभमेळ्यात शाहीस्नानासाठी भाविकांचा निरुत्साह, जेमतेम सव्वा लाख भाविकांची रामकुंडवर उपस्थिती. दहा लाख भाविकांच्या उपस्थितीची होती अपेक्षा.
* कुशावर्तावर दीड लाख भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज.
* लक्ष्मीनारायण मंदिराजवळ निर्मोही आखाडा व दिगंबर आखाड्यामध्ये झाला वाद.
* स्वतंत्र आखाडा, स्नानाची वेळ न दिल्याने साध्वी त्रिकाल भवंता यांचा शाहीस्नानावर बहिष्कार.
* नाशिकमधील रामकुंडावर पालकमंत्री व कुंभमेऴा मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी दाखल झाले आहेत.
* महामंडलेश्वर कॉम्प्युटर बाबा यांची हेलिकॉप्टरने शाही स्नानाला जाण्याची परवानगी  प्रशासनाने नाकारल्याने ते रथातून मिरवणूकीत सहभागी.
* दत्तात्रय, श्री गणेश आणि अग्नी देवता या ईष्ट देवतांचे भक्तिभावाने पूजन केल्यानंतर नागा साधूंनी स्नान केल असून आखाड्यांसोबतच्या सेवकांनीही स्नानाची पर्वणी  साधली.
* पंच दशानन जुना आखाडा, आवाहन आखाडा आणि पंचायती अग्नी आखाड्याचे शाही स्नान उत्साहात संपन्न झाले आहे.
* साधू-महंतांचे शाहीस्नान झाल्यानंतर इतर भाविक शाहीस्नान करतील असे पालक मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
* शाही मिरवणुकीस यंदा सकाळी ६ पासूनच प्रारंभ होणार आहे. सर्वप्रथम निर्वाणी आखाडा सकाळी ६ वाजता, त्यानंतर दिगंबर आखाड्याची मिरवणूक सकाळी ६.३० वाजता, तर निर्मोही आखाड्याची मिरवणूक सकाळी ७ वाजता साधुग्राममधून रामकुंडाकडे मार्गस्थ होणार आहे. प्रत्येक आखाड्याला मिरवणुकीसाठी एक तासाचा वेळ निर्धारित करून देण्यात आला आहे.
* सिंहस्थासाठी देशभरातील साधू, संत आणि महंत यांचा मुक्काम असलेल्या साधुग्राम व तपोवनाचे सगळ्यांच्याच मनामध्ये कुतूहल असल्याने हा परिसर पाहण्यासाठी व विविध मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.