सदगुरू सीतारामबाबा उंडेगावकर यांचा समाधी सोहळा खर्डा (ता. जामखेड) येथेच होण्यावर पुण्यातील न्यायालयाच्या आदेशाने शिक्कामोर्तब झाल्याने खर्डेकरांनी सोहळय़ाची तयारी सुरू केली. समाधी सोहळा उद्या, मंगळवारी सकाळी ११ वाजता सीतारामगढी येथे होणार आहे. त्यासाठी आजपासूनच भाविकांची गर्दी सुरू झाली आहे.
सीतारामबाबांचा समाधी सोहळा खर्डा की उंडेगावात (ता. भूम, उस्मानाबाद) येथे होणार या वादावर आज न्यायालयाच्या निर्णयामुळे पडदा पडला. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात पुण्याहून बाबांचे पार्थिव सोमवारी दुपारी नेण्यात आले. हे वृत्त खर्डा येथे समजताच भाविकांनी समाधान व्यक्त केले. या वादाच्या पाश्र्वभूमीवर खर्डा गाव सोमवारी तिसऱ्या दिवशीही बंदच होते. समाधी सोहळय़ानिमित्त उद्याही बंदच पाळला जाणार आहे. बाबांच्या निधनामुळे गावातील गणेशोत्सवही साधेपणाने करण्याचा निर्णय तरुण मंडळांनी  घेतला आहे. काही ठिकाणी मंडळांत केलेली सजावटही काढून घेण्यात आली.
बाबांच्या सीतारामगढीसाठी खडर्य़ामधीलच काही दानशूर व्यक्तींनी जागा दिलेली आहे. बाबांचे पार्थिव सोमवारी रात्री खर्डा येथे पोहोचले. ते भाविकांच्या दर्शनासाठी खर्डा इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात ठेवले जाणार आहे. तेथे सायंकाळपासूनच रांगा लागण्यास सुरुवात झाली होती. उद्या सोहळय़ासाठी राज्यभरातील भाविक येणार आहेत. त्यामुळे पोलिसांचे धडक कृती दल व दंगल काबू पथक खर्डा गावात तीन दिवसांपासून तळ ठोकून आहे.
बाबांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. त्यांचा समाधी सोहळा खर्डा की उंडेगाव येथे करायचा याचा वाद झाल्याने, हा वाद न्यायालयात गेला होता. बाबांची दोन मृत्युपत्रे होती.