पावसाने दडी मारल्याने मराठवाडय़ात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. खरीप हंगाम हातातून गेला आहे. येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही, तर रब्बी हंगामही जाण्याची शक्यता आहे, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी त्या नागपूर येथे आल्या होत्या. रविभवनात पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठवाडय़ातील दुष्काळाची भीषण स्थिती कथन करून, सरकार राबवित असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जायकवाडी धरणातील पाणी साठा संपत आल्याने आता फक्त तेथील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आले आहे. इतर कामांसाठी त्याचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जायकवाडीच्या वरच्या धरणातच पाणी नसल्याने हे धरणही कोरडे पडले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. दीड लाख विहिरी खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, पाऊसच नसल्याने अडचण झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न हा जुन्याच सरकारच्या कार्यकाळापासून सुरू आहे. विद्यमान सरकारने यासाठी काही उपाय योजले आहेत. मात्र, फक्त पॅकेज जाहीर करून आत्महत्या थांबणार नाहीत, तर शेतमालाला भाव आणि पूरक व्यवसाय हा त्यावर पर्याय ठरू शकतो, असे मुंडे म्हणाल्या. मराठवाडय़ासाठी विशेष पॅकेज देण्याची सरकारची योजना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार गंभीर आहे. मात्र, विरोधक त्याचे राजकारण करीत आहेत. भाजपला जातीयवादी म्हणणारे पक्षच जातीपातीचे राजकारण करीत आहेत, असे मुंडे म्हणाल्या. मुख्यमंत्री राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले