सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आजचे हे ६ वे पुष्प. प्रात:कालचे राग श्रोत्यांना ऐकण्याचा दुर्मिळ असा हा कपिलाषष्ठीचा योग. सुरुवातच श्रीमती कल्पना झोकरकर यांच्या गायनामधून झाली ती ‘भूपाल तोडी’ या मिश्र रागामधून- सारे्ग्पध्सा। असे सुंदर स्वर; अतिशय संथ, दाणेदार स्वरांनी सुरुवात झाली आणि वातावरण प्रसन्न सुरांनी भरून गेले. तालाचे अवधान उत्तम, आवाजात गोडवा भरलेला. दडपण विरहित, खुलेपणाने, गायनाची कला केवळ डोळस रियाजाने येते हे श्रोत्यांना त्यांनी दाखवून दिले. तार सप्तकातील गंधार पंचमापर्यंत अवघड तानांपर्यंत जाऊनही स्वरांची शुद्धता कायम रहात होती. अशा या अभ्यासू गायिकेने यानंतर ‘भनक भयी’ ही पं. श्रीकृष्ण रातंजनकरांची सुप्रसिद्ध त्रितालामधील बंदिश सुरेख पेश केली.
यानंतर ‘सिंदूरा’ रागामधील टप्पा एकवाई त्रितालामध्ये नजाकतीने गायला. शेवटी ‘रसिया वो नारी बनावो री।’ हा ‘रसिया’ हा गीतप्रकार भगवान श्रीकृष्णाच्या रासक्रीडांचे वर्णन करणारा अत्यंत भक्तिभावाने व लडिवाळपणे सादर केला.
त्यांना साथ संगत अशी – स्वरसंवादिनी- सुयोग कुंडलकर, तबला – भरत कामत, श्रुती – अनुजा झोकरकर, लीला वैद्य
यानंतर स्वरमंचावर आपले सर्वाचे लाडके, पुण्याचे वैभव असे पं. विजय कोपरकर यांचे आगमन झाले. पं. मधुसूदन पटवर्धन, पं. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी या महान गुरुचर्याकडून ही गायनकला मोठय़ा कष्टाने व अथक रियाजाने प्राप्त केली. अशा या उच्चविद्याविभूषित गायकाने आपला व्यवसाय सांभाळून हे गायनाचे अंग, संगीताचा हा अमूल्य ठेवा जिवापलीकडे जपून ठेवला, जोपासला आणि पुढील पिढीकडे मोठय़ा आस्थेने प्रवाहित केला आणि करीत आहेत. अशा या गुणी बहुश्रुत गायकाचे गाणे ऐकणे हा मोठा भाग्याचा योग आहे. ज्यांना पं. वसंतराव देशपांडे यांचा गुरुकृपेचा चमत्कार पाहायचा असेल त्यांनी पं. कोपरकरांचे गाणे ऐकावे.
पं. कोपरकरांनी सर्वप्रथम राग ‘बसंत मुखारी’ हा सादरीकरणासाठी घेतला.
पंचमापर्यंत ‘भैरव’ आणि त्यापुढे ध् न् िसो हे स्वर भैरवीचे. असे हे भैरव-भैरवीचे मिश्रण असलेला हा राग प्रात:काळ प्रसन्न करून गेली. विविध वेगवान ताना, गमक, सरगम यांचा ‘शाही खजाना’ पंडितजींनी श्रोत्यांपुढे अक्षरश: ओतला. दोन-दोन, तीन-तीन आवर्तनांच्या लांबलचक ताना यांनी शामियाना भरून व भारून गेला.  
आपल्या गाण्याचे समापन त्यांनी स्व. पं. रविशंकर यांचा राग ‘परमेश्वरी’, ‘मातेश्वरी परमेश्वरी’ असे शब्द असलेल्या रूपक तालामध्ये भावपूर्ण भक्तिपूर्ण आर्तभावाने साद1र केला.
त्यांचे सर्व गाणे ऐकता संत एकनाथ महाराजांच्या एकनाथी भागवतामधील एक ओवी आठवते ती अशी.
पाव्यामधून निघती सूर।
नव्हे हा पाव्याचा गुण।
कळा – जाण गात्याची।।
 तसे हे व्यक्त सुंदर गायन पं. कोपरकरांचे. पण यामागील गाणारे अव्यक्त मात्र हे ‘गुरुचय’ आहेत हेच खरे. गुरुंचे आशीर्वादाचे ते हेच फळ आहे.
शेवटी ‘संन्यस्तखङग्’ या वीर सावरकरांच्या नाटकामधील ‘शतजन्म शोधिताना’ हे वीररस व्यथा निर्माण करणारे नाटय़गीत सादर करून हे भावपूर्ण गायन, या महोत्सवाचा कळस ठरावा असे थांबविले ते प्रचंड टाळ्या घेऊन.
यांना साथसंगत अशी होती- स्वरसंवादिनी – राहुल मुळे, तबला – पं. रामदास पळसुले, श्रुतीवर राहुल गोळे, मंदार गाडगीळ, स्वरसाथ- मंदार फाटक.
या स्वरांचा अंमल उतरायच्या आतच पुन्हा ‘स्वरोदय’ झाला. पं. शिवकुमार यांचे स्वरमंचावर आगमन झाले ते आपली लाडकी ‘जीवाचे जीवन’ अशी देखणी, अनोखी ‘शततारा वीणा’ घेऊन. साथीला पं. विजय घाटे यांना, तसेच तंबोरी वादनासाठी आपले शिष्य दिलीप काळे यांना घेऊन. सौंदर्याचा मानबिंदू असलेले ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ असे देखणे बहिरंग लाभलेले पं. शिवकुमार. आपले देखणे अंतरंगही श्रोत्यांनी पाहावे ऐकावे यासाठी प्रथम ‘अंतध्र्वनी’ हा स्वनिर्मित राग सादर केला.
अतिशय सुंदर स्वरांमधली आलापी जणू मयूराचे पदलालित्य घेऊन पदन्यास करीत होती. लयकारी स्वरांच्या सुंदर लता ठायी ठायी शोभत होत्या, वर्णातीत अशी आलापी झाल्यानंतर झपतालामध्ये याच अंतध्र्वनी रागामधील ‘गत’ सुरेख दाद घेऊन गेली. शेवटी द्रुत त्रितालामधील झालाही अत्यंत सुरेख सादर केला.
अशा रितीने सकाळचे स्वरमय सत्र संपले.