तीव्र दुष्काळामुळे मोठय़ा संख्येने लोक कामाच्या शोधात मुंबई-पुण्याकडे जाऊ लागले आहेत. सोनपेठ व गंगाखेड तालुक्यांतील मजुरांना घेऊन पुण्याकडे घेऊन जाणाऱ्या अ‍ॅपेरिक्षाला समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील खासगी बसने जोराची धडक दिली. शुक्रवारी पहाटे घडलेल्या या अपघातात रिक्षामधील सहा जण ठार, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. मृतांत महिलेसह दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.
परभणी जिल्ह्य़ाच्या गंगाखेड व सोनपेठ तालुक्यांतील लोक दुष्काळी स्थितीत हाताला काम मिळवण्यासाठी मोठय़ा संख्येने पुण्याकडे स्थलांतरित होत आहेत. गुरुवारी सायंकाळी या अ‍ॅपेरिक्षातून तीन कुटुंबांतील सदस्य पुण्याकडे निघाले होते. बीड-नगर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास पांढरी (तालुका आष्टी) शिवारात समोरून आलेल्या खासगी बसने जोराची धडक दिली. धडक बसताच रिक्षा काही अंतरावर फरफटत गेली. यात रिक्षाचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. रिक्षात अर्धवट झोपेत असलेल्या मजुरांना काही समजण्याच्या आतच मृत्यूने कवटाळले.
अरुण लक्ष्मण गायकवाड (वय ३५), निर्जला अरुण गायकवाड (वय ६, दोघे वाघलगाव), राजू बन्सी खकसे (वय २८), आदित्य राजू खकसे (वय ६ महिने, दोघे डिघोळ, तालुका सोनपेठ), बंडू बाबुराव जोगदंड (वय ३०), केसरबाई बंडू जोगदंड (वय २८, खातगाव, तालुका गंगाखेड) अशी मृतांची नावे आहेत. या सर्वाचा जागीच मृत्यू झाला. मनीषा राजू खकसे (वय २३) गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेजस अरुण गायकवाड (वय १२) हाही जखमी झाला. अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.