मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेतजवळील पवना पोलीस चौकीजवळ मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास भरधाव गाडी उलटून झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील सहा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

आदित्य दीपक भांडारकर (वय १७, रा. पाटीलनगर, बावधन, स. प. महाविद्यालय), अभिषेक अरुण रॉय (वय २१, रा. पाषाण, सिंहगड कॉलेज), यश अजय शिरोली (वय १८, रा. बावधन, सरिता कॉलेज), राजाराम दत्तात्रय भिलारे (वय २०, रा. कोथरूड, सिंहगड कॉलेज), जोकिम जॉन सॅम्युअल (वय १९, रा. पुनवळे, मुळशी, काशिबाई नवले कॉलेज) आणि उमेश गिरीश पाटील (वय २०, रा. पुणे, मूळचा राहणार औरंगाबाद) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास द्रुतगती मार्गावर लोणावळ्याकडून पुण्याच्या दिशेने या युवकांची गाडी भरधाव जात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अतिवेगात ती उलटली आणि त्यानंतर गाडी दूरवर फरफटत गेली. या अपघातात तीनजणांचा जागी तर तीनजणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

विद्यार्थी गांजाच्या नशेत? पवना पोलीस चौकीजवळ मंगळवारी द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातातील सियाज गाडीत गांजाच्या दोन पुडय़ा सापडल्याचे कामशेतचे पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी सांगितले. गांजाची नशा करत गाडी चालविल्याने अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.