अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणात सहा संशयितांना अटक झाली असून, आणखी पाच जणांची नावे चर्चेत आहेत. आज कोकण पोलीस महानिरीक्षकांच्या दौऱ्यामुळे पोलिसांचा तपास झाला नाही. संशयित बालगुन्हेगार स्वरूप आरेकरला वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिसांनी संशयित व पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. कोकण पोलीस महानिरीक्षक सिंधुदुर्ग दौऱ्यावर असल्याने या प्रकरणी अधिक काही उघड झाले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान पोलीस उपअधीक्षक विनीता साहू यांचा भ्रमणध्वनीही बंद असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
या प्रकरणातील संशयित अमित महादेव मोर्ये, आदित्य सुधन आरेकर, मंगेश निळकंठ सावंत, नंदकिशोर बाळकृष्ण गावडे, सुप्रियान महमूद शेख हे पाचही जण पोलीस कोठडीत आहेत, तर सहावा संशयित स्वरूप हेमंत आरेकर हा बालगुन्हेगार असल्याने  त्याला वडिलांचा जामीन घेऊन ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणातील स्वरूप हेमंत आरेकर याचे वय २१ असल्याचे पोलीस तपास अधिकारी जोत्स्ना भामिष्टे यांनी नमूद केले होते, पण अ‍ॅड. परिमल नाईक यांनी त्याचे वय अद्यापी १८ वर्षे पूर्ण नसल्याचा युक्तिवाद विशेष न्यायालयात केल्यावर स्वरूप आरेकरला बालसुधारगृहात पाठविण्यात आले. बालसुधारगृहाच्या जिल्हापीठासमोर स्वरूप आरेकरला हजर करण्यात आले. अ‍ॅड. परिमल नाईक यांनी युक्तिवाद करत त्याचे वडील हेमंत आरेकर यांच्या ताब्यात मुलाला द्यावे असे मांडले असता वडिलांचा जामीन घेऊन त्याला पोलिसांच्या या प्रकरणातील तपासाला सहकार्य करावे असे निर्देश देत ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणात आता पोलिसांच्या पोलीस कोठडीत पाच जण आहेत. या प्रकरणी पीडित मुलगी आणि सहाही संशयितांची वैद्यकीय तपासणी करून नमुने तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, असे पोलिसांनी आज स्पष्ट केले.
या प्रकरणातील पीडित मुलीचा जबाब आज येथील न्यायालयात नोंदविण्यात आला. हा जबाब इनकॅमरा नोंदला गेला असून तो न्यायालयाने सीलबंद केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांना दिलेला जबाब पाहता आज न्यायालयात सत्य वस्तुस्थिती कथन करण्यात आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. या अत्याचारित मुलीची आई कालच तिला भेटली होती. तिचा ताबा मिळावा म्हणून तिने न्यायालयात अर्जही केला आहे. अंकुर महिला निवारा केंद्रात सध्या ती पोलिसांच्या करडय़ा नजरेखाली आहे. फक्त तिला तिच्या आईलाच भेटण्यास देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी आणखी पाच तरुणांची नावे चर्चेत आहेत. ते भूमिगत झाल्याचे बोलले जात आहे. या तरुणांना अटक व्हावी म्हणून राजकीय दबाव आहे. दरम्यान अन्य संशयितांना अटक करावी म्हणून काँग्रेसच्या वतीने शनिवारी पोलीस उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे असे काँग्रेसने जाहीर केले आहे.
या प्रकरणातील आणखी संशयित असणाऱ्यांची यादी पोलिसांकडे आहे असे सांगून पैसे उकळण्याचा धंदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र सावंतवाडी पोलिसांनी कानावर हात ठेवत हे प्रकरण पोलीस उपअधीक्षक विनिता साहू यांच्या अखत्यारीत असल्याने बोलण्यास नकार दिला.
या प्रकरणी मनसे आणि काँग्रेस आक्रमक होत आहे. राजकीय स्वरूपाच्या आरोप-प्रत्यारोपावरून प्रकरण आणखी तापणार असल्याचे बोलले जात आहे.