अमरावती शहराला लागून असलेल्या पोहरा-मालखेड प्रस्तावित अभयारण्यात वीजप्रवाह सोडून सहा नीलगायींची निर्घृण शिकार करण्याची घटना उघडकीस आल्याने वन विभाग आणि महावितरण कंपनी यांच्यात समन्वय नसल्याचे पुन्हा एकवार स्पष्ट झाले आहे. विदर्भाच्या जंगलात घडलेली अशा प्रकारची महिनाभरातील ही चौथी घटना आहे. निर्ढावलेल्या शिकाऱ्यांनी ट्रॅक्टरचा वापर करून नीलगायींचे मृतदेह नेताना शिकारीचे पुरावेदेखील नष्ट केले आहेत.
बुधवारी अमरावतीच्या निसर्ग संरक्षण संस्थेचे काही पक्षिमित्र पोहरा-मालखेड या प्रस्तावित अभयारण्यात वन्यप्राणी सर्वेक्षणाचे काम करीत असताना एक शिकारी ट्रॅक्टरमधून नीलगायींना नेताना दिसून आला. मात्र हा शिकारी तेथून फरार झाला. अधिक तपासणी केली असता या परिसरातील तलावानजीकच्या शेतात विजेची तार आढळून आली. तसेच विजेच्या खांबांवर आकडे टाकून वीज घेतल्याचेही स्पष्ट झाले. याच्याच साह्याने नीलगायींची शिकार करण्यात आली.
अमरावतीचे जिल्हा मानद वन्यजीव रक्षक विशाल बनसोड यांना याची सूचना देण्यात आल्यानंतर वन विभागाने कारवाई सुरू केली. इलेक्ट्रिसिटी कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत शिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याबरोबरच वन विभाग आणि महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आसोले आणि सातपुडा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोर रिठे यांनी केली आहे.