जिल्ह्य़ात मुंबई-आग्रा महामार्गावर सोन्याच्या विटा घेऊन जाणारे वाहन अडवून तब्बल ५८ किलो सोने लुटीचा तपास चोवीस तासानंतरही ‘जैसे थे’ अवस्थेत असून, तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई येथील झी गोल्ड कंपनीच्या ६० किलो सोन्याच्या विटा घेऊन महिंद्राची बंदीस्त स्वरुपाची मोटार शिरपूरच्या रिफाईनरीकडे निघाली होती. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घोटी-नाशिक दरम्यानच्या वाडिवऱ्हे शिवारात ही मोटार एका कारमधून आलेल्या पाच जणांनी अडवली. पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत त्यांनी चालक प्रवीण दुबे, कर्मचारी समीर पिंजारी आणि सुरक्षारक्षकांस पिस्तुलीचा धाक दाखवत मोटारीतील एक किलो वजनाच्या ६० पैकी ५८ विटा काढून घेत कारमधून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू केली. परंतु, दरोडेखोरांविषयी कोणतीच माहिती मिळाली नाही. ठिकठिकाणी पोलीस पथक रवाना करण्यात आले असून तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.