स्नेहालय संस्थेच्या विश्वस्त मीनाताई शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. त्या ४२ वर्षांच्या होत्या. स्नेहालय संस्थेसाठी त्या पूर्णवेळ कार्यकर्त्यां म्हणून काम करत होत्या. लालबत्ती भागातील महिलांवर पोलीस, गुंड, कुंटणखाना चालक यांच्याकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला.
मीनाताई सन २००० पासून स्नेहालय संस्थेच्या संपर्कात आल्या. देहव्यापारातील बालिकांची मुक्तता व त्यांच्या पुनर्वसनासाठी स्नेहज्योत प्रकल्पाची संकल्पना त्यांनी मांडली व त्यासाठी काम केले. या प्रकल्पाच्या मानद संचालक म्हणून त्या काम पाहात होत्या. शोषित महिलांच्या सर्वागीण सर्वेक्षणाच्या पाथफाइंडर या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मोहिमेत त्यांनी सहभाग घेतला. नैसर्गिक आपत्तीत नगरमधील वेश्या व्यवसायातील महिला सर्वप्रथम आपली एक दिवसाची कमाई देशाला देतात, याची प्रथा त्यांनी सुरू केली. सन २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या वेश्यांच्या राष्ट्रीय पुनर्वसन योजना आराखडा समितीच्या त्या सदस्या होत्या.
संस्थेचे सुवालाल गुंदेचा, संजय गुगळे, अंबादास चौहान, जया जोगदंड, संगीता शेलार, प्रवीण मुत्याल, यशवंत कुरापट्टी, दीपक बुरम आदींनी शोकसभेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.