समाजवादी चळवळीला ना राजकीय यश मिळाले, ना सामाजिक अभिसरणाच्या क्षेत्रात फारसा प्रभाव टाकता आला. असे का झाले, याचे आत्मपरीक्षण करणे ही शिबिरांची आवश्यकता बनली असल्याचे मत, माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केले. औरंगाबाद येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या समाजवादी राष्ट्रीय संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. त्यांचे भाषण डोळ्यात अंजन घालणारे होते, अशी प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
समाजवादी नेत्यांना राजकारणात पडण्याची पूर्वी घाई झाली होती. विचाराने कार्यकर्ता पुढे जावा, असे ठरविण्याऐवजी समाजवादी विचारांची टोपी आणि नारा निवडून येणाऱ्या माणसाच्या हाती दिला. ती चूक होती. इतिहासात अनेक मोठय़ा चुका चळवळीने केल्या आहेत. नव्या पिढीत अनेकांना त्या माहीत नसतील. पण जुनीजाणती माणसे प्रश्न विचारतील. त्यामुळे आत्मपरीक्षणाची गरज आहे. किमान स्वल्पविराम आणि शब्दरचनेवरून होणारे मतभेद टाळता आले तरी बरेच काही होऊ शकेल, असेही चपळगावकर यांनी सांगितले. समाजात समाजवादी चळवळीविषयी आस्था बाळगून असणारा मोठा वर्ग आहे. पण त्यांना जोडून घेण्यासाठीचा कार्यक्रम आपल्याकडे नाही. तो करता आला तरी पुरेसे होईल. सध्या लोकशाहीच्या शिखर संस्थांवर आपल्याच विचाराचे कार्यकर्ते बसविण्याचे काम चालू आहे. समाजवादी नेत्यांनी त्यांचे सरकार होते तेव्हा असे काही न करता विचाराने वागणाऱ्या कार्यकर्त्यांला लाभ दिला नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. हा काय आपलाच आहे, त्यामुळे दुसऱ्यांनाच महत्त्व दिले गेले, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यांनी केलेल्या समारोपाच्या भाषणामुळे ‘अ‍ॅँटीबायोटिक’चा डोस मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या वेळी डॉ. सुनीलम, डॉ. कलमे, ललित बाबर, अण्णासाहेब खंदारे यांची उपस्थिती होती.