सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारी अंतिम दिवशी सर्व प्रमुख पक्ष व आघाडय़ांच्या नेत्यांनी ‘बंडोबां’ना ‘थंडोबा’ करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार प्रयत्न केले. तर दुसरीकडे उमेदवारांची आयात करण्याचे राजकारणही खेळले गेले.

जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी ७६७, तर ११ पंचायत समित्यांच्या १३६ जागांसाठी तब्बल १४५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यात जवळपास सर्वच प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसून आले असता हे बंड शमवण्यासाठी ज्या त्या नेतृत्वाने प्रयत्नांची शिकस्त चालवली होती.

सोलापुरात उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या दोन्ही तहसील कार्यालयांच्या आवारात तसेच जिल्हय़ात सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या परिवारात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांना पकडून वा पुढे घालून आणले जात होते. सत्ताधारी राष्ट्रवादीसह काँग्रेस, भाजप व शिवसेना या सर्व प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरीची लागण झाल्याने त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी बंडखोरी टाळण्यासाठी खटपट करताना साम, दाम, दंड, भेद या नीताचाही वापर केल्याचे सांगण्यात आले.

पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील पंचायत समितीच्या जागेवर दहशत व गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा शिक्का असलेला व भाजपने पुरस्कृत केलेला गोपाळ अंकुशराव हा बिनविरोध निवडमून आला. पंढरपूरच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्हय़ात शुचिर्भूत व्यक्तिमत्त्व समजले जाणारे स्थानिक बुजुर्ग नेते सुधाकर परिचारक यांच्या गटाने अंकुशराव यांचे उदात्तीकरण केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मोहोळ तालुक्यातील अनगर येथील पंचायत समितीच्या जागेवर राष्ट्रवादीचे अजिंक्यराणा पाटील हे अविरोध निवडून आले.

राष्ट्रवादीच्या गटातटाच्या राजकारणात जिल्हा परिषदेची सत्ता हेलकावे खात असताना पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी भाजपशी सलगी करून महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात देण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुका गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. बार्शी येथे राष्ट्रवादी व भाजप यांच्यात दुरंगी लढतीचे चित्र आहे. मोहोळ येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्या गटाविरोधात याच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी बंड करीत राष्ट्रवादीचेच खासदार धनंजय महाडिकप्रणीत भीमा विकास आघाडीला समर्थन दिले आहे. या आघाडीत इतर पक्षांचाही समावेश आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक गायकवाड यांनी बंडखोरी केली असून, त्यांनी खासदार महाडिक यांच्या भीमा विकास आघाडीद्वारे निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. माढा येथे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बालेकिल्ला अभेद्य राहण्यासाठी प्रयत्न होत असताना मोडनिंब गटात जि.प.चे समाजकल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी शिंदे बंधूंचीच खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

करमाळा तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली तरी शिवसेना व भाजपपुरस्कृत संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी यांच्यात बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीचे मोहिते-पाटील यांच्या विरोधात काँग्रेससह भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा एकत्र येण्याचा प्रयत्न फसला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून भाजपमध्ये दाखल झालेले उत्तम जानकर यांचा जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही जागांवरील उमेदवारी अर्ज फेटाळला गेल्याने तेथील विरोधकांना धक्का बसला आहे. अक्कलकोटमध्ये काँग्रेस व भाजप यांच्यात दुरंगी लढतीचे चित्र समोर आले आहे.