लक्ष्मीदर्शनासह हाणामाऱ्यांचे प्रकार

सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद तथा पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी रविवारी सायंकाळी पाच वाजता समाप्त झाली. अखेरच्या क्षणापर्यंत प्रचाराचे रण माजविण्यासाठी प्रमुख पक्षांच्या प्रबळ उमेदवारांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रचारानंतर आता गुप्त घडामोडींना वेग आला असून यात ‘लक्ष्मीदर्शना’बरोबरच जातीपातीची व धर्माची गणिते घालून मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न जोर धरत असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या दहा-पंधरा दिवस सर्वत्रच प्रचार शांततेने झाला असताना शेवटच्या दिवशी मात्र अटीतटीच्या संघर्षांमुळे काही ठिकाणी हाणामाऱ्यांचे प्रकार घडले. शहरातील नई जिंदगी चौक परिसरात राष्ट्रवादी व एमआयएम या दोन पक्षांच्या तुल्यबळ उमेदवारांच्या पदयात्रा एकमेकांसमोर भिडल्या आणि त्यातून दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. यात राष्ट्रवादीचे स्थानिक उमेदवार तथा माजी उपमहापौर हारून सय्यद (वय ५२) यांच्यासह सहा जण जखमी झाले. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद नोंदविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. तर दुसरीकडे दमाणीनगर परिसरात राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेनेचा संघर्ष तीव्र झाला असतानाच सायंकाळी भगव्या रंगाच्या सुमारे पाचशे साडय़ा महिलांना वाटप करण्याचा प्रकार उजेडात आला. या साडय़ांचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. बहुसंख्य प्रभागात सायंकाळनंतर अनेक प्रभागात प्रबळ उमेदवारांचे समर्थक एकमेकांच्या विरोधात मतदारांना विविध माध्यमातून आमिषे दाखविली जात असल्याबद्दल तक्रारी करीत असताना आढळून आले. तर काही ठिकाणी पोलिसांनाही तशी माहिती दूरभाष्याद्वारे कळविली जात होती. त्यानुसार पोलीस यंत्रणाही खातरजमा करीत पुढील कारवाई करण्यात गुंतली होती.

महापालिकेच्या १०२ जागांसाठी सत्ताधारी काँग्रेससह राष्ट्रवादी तसेच भाजप व शिवसेना अशा प्रमुख पक्षांसह इतर छोटय़ा-मोठय़ा पक्षांचे मिळून ६२३ उमेदवार तर जिल्हा परिपदेच्या ६८ जागांसाठी २६७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपने कोणत्याही परिस्थितीत सोलापूरची महापालिका व जिल्हा परिषद ही दोन्ही सत्तास्थाने काबीज करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी एकदा जिल्ह्य़ात बार्शी व वेळापुरात तर दुसऱ्यांदा सोलापुरात प्रचारासाठी आले होते. शहरात त्यांनी रात्री मुक्काम ठोकून पक्षाला जास्तीचे बळ दिले.केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याही प्रचारसभा झाल्या. शिवाय विजय देशमूुख, सुभाष देशमुख तसेच राजकुमार बडोले या तीन मंत्र्यांच्याही प्रचारसभा झाल्या. मात्र दोन्ही मंत्री देशमुखांमध्ये तीव्र मतभेद दिसून आले. काँंग्रेससाठी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना तब्बल आठ दिवस सोलापुरात तळ ठोकावा लागला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदींनी प्रचारसभा घेऊन भाजप व शिवसेनेवर हल्ला चढविला.

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा अपवाद वगळता शिवसेनेचे कोणीही स्टार प्रचारक आले नाहीत. त्यामुळे स्थानिकांवर प्रचाराची जबाबदारी होती. राष्ट्रवादीची अवस्था तर अतिशय बिकट झाल्याचे दिसून आले.  या पक्षाचा एकही नेता प्रचारासाठी आला नाही. ग्रामीण भागात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचाच तेवढा काय तो अपवाद. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचार यंत्रणेला मर्यादा आल्या. अर्थात शहरात व जिल्हा ग्रामीण भागात प्रचाराचा रंग व ढंग वेगवेगळा होता.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बहुसंख्य उमेदवारांनी पदयात्रा, कोपरा सभा व सभांसह घरोघरी प्रत्यक्ष भेटीगाठी  घेण्यावर अधिक भर दिला होता. आपापल्या प्रभागातून जास्तीत जास्त समर्थन आपल्या बाजूने मिळण्यासाठी अनेक प्रबळ उमेदवार व त्यांची यंत्रणा कामाला लागली होती. शेवटच्या क्षणापर्यंत प्रचाराचा जोर वाढत गेला होता. रविवारी शेवटच्या दिवशी अनेक प्रभागात प्रब़ळ उमेदवारांनी एकमेकांपेक्षा सरस अशा पदयात्रा काढून मोठे शक्तिप्रदर्शन केले.