सोलापूर जिल्ह्य़ात गेल्या तीन दिवसांत पडलेल्या पुष्य नक्षत्राच्या पावसामुळे दुष्काळी भागाला काहीसा आधार मिळाला असला तरी आतापर्यंत केवळ चार तालुक्यांनाच पावसाची सरासरी गाठता आली. उर्वरित सात तालुक्यांमध्ये अद्यापि तुलनेने कमीच पाऊस पडल्याचे दिसून येते.
दरम्यान, सध्या पडणारा पाऊस खरीप हंगामातील पिकाना पोषक मानला जात आहे. तर दुसरीकडे बऱ्याच वर्षांनंतर यंदा खरीप हंगामात पिकांच्या पेरण्यांचे प्रमाण जवळपास तिपटीने वाढले असून दोन लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. त्याची टक्केवारी ३०४ एवढी आहे.
जिल्ह्य़ात यंदा मृगापाठोपाठ आद्रा व पुनर्वसू ही तिन्ही नक्षत्रे कोरडीच गेली आहेत. त्यामुळे सार्वत्रिक चिंता व्यक्त होत असताना सुदैवाने गेल्या १९ जुलै रोजी आलेल्या पुष्य नक्षत्राने सर्वाना आश्वस्थ केले आहे. गेल्या चार दिवसांपासून कोठे ना कोठे पावसाची हजेरी लागत आहे. गेल्या चार दिवसात मिळून ६१४.२६ मिमी (सरासरी ५५.८७) इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील पावसाची सरासरी १५९.५९ मिमीपर्यंत झाली आहे. तथापि, यात माळशिरस (१७१.५२), माढा (१७६.२९), दक्षिण सोलापूर (२१५.८६) व सांगोला (१४५.१०) या चार तालुक्यांना सरासरी गाठणे शक्य झाले आहे. उर्वरित उत्तर सोलापूर (१९०.८६), बार्शी (१५८.५७), अक्कलकोट (१८६.५५), मोहोळ (९५.३९), करमाळा (१५०.५१) पंढरपूर (१४९.४२) व मंगळवेढा (११४.७७) या तालुक्यांमध्ये आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. माळशिरस तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची आकडेवारी दिसत असली तरी अकलूज भागात नीरा नदी अद्यापि कोरडीच राहिली आहे. काल शनिवारी मंगळवेढा (१७.५७), पंढरपूर (१६.२७), सांगोला (१०.०९), माळशिरस (३.८०), मोहोळ (३.३१) आदी भागांत पावसाने कमीजास्त प्रमाणात हजेरी लावली. दरम्यान, सध्या होत असलेला पाऊस खरीप हंगामात लागवड झालेल्या पिकांच्या उगवणीसाठी पोषक मानला जात आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर जिल्ह्य़ातील खरीप हंगामात पिकांच्या पेरण्यांचे क्षेत्र जवळपास तिपटीने वाढून दोन लाख ४० हजार हेक्टपर्यंत पेरण्या झाल्या आहेत. यंदाच्या वर्षी ७९ हजार हेक्टर एवढेच क्षेत्र खरीप हंगामासाठी नियोजित होते. यात सर्वाधिक ८५ हजार २५३ हेक्टर क्षेत्रावर तूर पिकांची पेरणी झाली आहे. तर १५ हजार ५९७ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली आहे.