सोलापूरात मतदानाच्या दिवशी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १३ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.  सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर रोड परिसरात ही घटना घडली आहे. वेळापूर येथे मतदारांना पैशांचे आमिष दिले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी संबंधित ठिकाणी धडक कारवाई करत १३ जणांना अटक केली. पैसे वाटप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ६७ हजार रुपये आणि मतदार याद्या देखील जप्त केल्या आहेत. नेमके मतदानाच्या दिवशी पैसे वाटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांचाही समावेश आहे.

वाचा: सोलापूरातील मतदानाचे अपडेट्स

 

पोलीस नाईक विनोद साठे यांनी दिलेल्या फियार्दीवरुन नानासो ज्ञानोबा कदम, सिताराम उत्तम कदम, संतोष मुरलीधर हजारे, बाबा महादेव हजारे, मच्छिद्र किसन हजारे, अशोक बापू कदम, शहाजी भगवान गोडसे, गजानन मधुकर कदम, सचिन शांताराम कदम, नवनाथ संदिपान थोरात, नानासो तुकाराम गोडसे, शिवाजी दादू धाडोरे, विठ्ठल दिगबंर कदम (सर्व.रा.शिगुर्णी.ता.माळशिरस ) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्यात आज १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठीचे मतदान सुरू आहे. राज्यातील तीन कोटी ७७ लाख ६० हजार ८१२ मतदार महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणूक रिंगणातील तीन हजार २१० जागांकरिता रिंगणात असलेल्या १७ हजार ३३१ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील. मतदानासाठी ४३ हजार १६० मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन लाख ७३ हजार ८५९ अधिकारी- कर्मचाऱ्यांबरोबरच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोलापूरात सकाळी ११.३० पर्यंत २४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.